देवरूख येथील डी-कॅड महाविद्यालयात १६ पासून ‘रंगसंवाद’

साडवली : देवरूख शहरातील डी-कॅड कला महाविद्यालयात १८ वे वार्षिक कला प्रदर्शनाचे १६ ते २३ या कालावधीत आयोजन करण्यात आले आहे. ‘रंगसंवाद’ हा यावर्षीच्या प्रदर्शनातील विषय आहे. १५ रोजी उरण येथील चित्रकार रूपेश पाटील हे विद्यार्थ्यांना निसर्ग चित्र प्रात्यक्षिक व मार्गदर्शन करणार आहेत. त्यांचे हस्ते १६ रोजी सायं. ४ वाजता या कला प्रदर्शनाचे उद्घाटन होणार आहे.

यावेळी जे. जे. स्कुल ऑफ आर्ट मुंबईचे प्रा. प्रफुल्ल सातीकर, नेहरू केंद्र आर्ट गॅलरी मुंबईचे संतोष पेडणेकर, कला शिक्षक जितेंद्र पराडकर, विष्णू परीट आदी मान्यवरांची उपस्थिती लाभणार आहे. दरम्यान, पराडकर व परीट यांना कला गौरव पुरस्काराने सन्मानित केले जाणार आहे. यानंतर विविध स्पर्धा परीक्षांमध्ये यश मिळविलेल्या विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात येणार आहे.

१७ रोजी सानिका आगाशे व अनुजा कानिटकर यांचे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन व कलेतील प्रात्यक्षिक दाखविले जाणार आहे. १८ रोजी विविध खेळ, १९ ते २२ कालावधीत फनी गेम्स, २३ रोजी विद्यार्थी रंगमंचावर विविध कलाविष्कार सादर करणार आहेत. विद्यार्थ्यांनी रेखाटलेल्या चित्रांचे १६ ते २३ या कालावधीत प्रदर्शन भरविण्यात येणार असून, नागरिकांना ते पाहता येणार आहे. या कार्यक्रमाला विद्यार्थी, पालक, हितचिंतक, नागरिकांनी उपस्थित राहावे, असे आवाहन क्रेडारचे अध्यक्ष अजय पित्रे, संचालक भारती पित्रे, प्राचार्य रणजित मराठे यांनी केले आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:59 AM 14/Feb/2025