दापोली : आधारकार्डमधील दुरुस्ती ठरतेय डोकेदुखी !

दापोली : विविध योजनांचा लाभघेण्यासाठी बँक आदी ठिकाणी आधारकार्ड अनिवार्य आहे. मात्र या आधारकार्डमधील दुरुस्ती करणे आता नागरिकांना डोकेदुखी ठरले आहे. आधारकार्ड हा ओळखीचा पुरावा आहे, नागरिकत्व किंवा जन्म तारखेचा पुरावा नाही असे आधारकार्डवर स्पष्ट म्हटलेले आहे. मात्र तरी ही एसटी तिकीट आणि शासनाच्या विविध योजना यांच्यासाठी आधारकार्ड वरील तारीख ही ग्राह्य धरली जात आहे. त्यामुळे अनेकांना विविध योजनांचा लाभ घेता येत नाही.

अनेकांचे जन्म दाखले आणि आधारकार्ड असा दहा ते बारा वर्षाचा फरक आहे. मात्र, ही दुरुस्ती दापोलीत आधारकार्ड केंद्रात करण्यासाठी गेल्यास यासाठी पासपोर्ट किंवा क्यू आर कोड असलेले जन्म दाखले घेऊन या असे सांगितले जाते. तर तहसीलदार आणि जिल्हाधिकारी यांना देखील या बाबत कोणतेही अधिकारी नाहीत असे या अधिकाऱ्यांच्या भेटीनंतर माहिती मिळत आहे.

जन्मतारखेची दुरुस्ती ही स्थानिक आधारकार्ड केंद्र चालक यांना करण्याचे कोणतेही अधिकार नाहीत अशी माहिती त्यांच्याकडून मिळत आहे. दापोली तालुक्यात काही कुटुंब अशी आहेत ज्यांच्या घरातील कमावत्या मुलाचा मृत्यू झाला आहे. अशावेळी त्यांना सांभाळणारा कोणीही नसल्याने शासकीय योजनेचा लाभ घेण्यासाठी असे कुटुंब शासन दरबारी धडपडत असतात.

मात्र आधारकार्डमधील जन्म तारखेचा उल्लेख योजनेचा लाभघेण्यासाठी जुळत नसल्याने असे कुटुंब या योजनेचा लाभ घेऊ शकत नाही. शाळेकडून मिळणारे जन्म दाखले हेदेखील दुरुस्तीसाठी ग्राह्य धरले जात नाहीत. तर पन्नास वर्षापूर्वी झालेल्या जन्माचे दाखले क्यूआर कोड कुठून आणायचे, असा सवाल आता सामान्य नागरिक प्रशासनाला विचारू लागले आहेत. त्यामुळे शासनाने याबाबत विचार करून अशा असंख्य कुटुंबांना आधार दुरुस्ती करून आधार द्यावा, अशी मागणी नागरिकांमधून होत आहे.

वारंवार दुरुस्ती करूनही जैसे थे…
आधारकार्डमध्ये वारंवार दुरुस्त्या करूनही त्यात बदल होत नाहीत. पूर्वी आहे तसेच आधारकार्ड पोस्टाने येत आहे. त्यामुळे आधारकार्डमध्ये सारख्या किती दुरुस्त्या करायच्या, असा संतप्त सवाल नागरिकांमधून विचारला जात आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:04 AM 14/Feb/2025