राजापूर : राजापूर लांजा विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार राजन साळवी यांनी काल शिवसेनेत (शिंदे गट) प्रवेश करताना राजापूर तालुक्यातील कोदवली, ओणी, पाचल, केळवली, देवाचेगोठणे विभागांसह राजापूर शहरातील उबाठाच्या तालुका आणि युवा सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी प्रवेश केला आहे. त्यांच्या या पक्ष प्रवेशाने शिंदे शिवसेनेची राजापूर विधानसभा मतदारसंघातील ताकद वाढणार असून ठाकरे शिवसेनेला फटका बसला आहे.
ठाण्यात झालेल्या कार्यक्रमात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी माजी आमदार राजन साळवी यांचे स्वागत केले. यावेळी पालकमंत्री उदय सामंत, आमदार किरण सामंतही उपस्थितीत होते. पक्षप्रवेशावेळी श्री. साळवी यांनी जोरदार शक्तिप्रदशर्न केले. तीन टर्म राजापूर मतदारसंघात आमदार राहिलेल्या साळवी यांचा तळागाळात चांगला संपर्क आहे. त्यामुळे त्यांना मानणारे राजापूर मतदारसंघातील कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. तालुक्यातील कोदवली, ओणी, पाचल, केळवली, देवाचेगोठणे या पाच जिल्हा परिषद गटातील विभागांतील विभागप्रमुख, उपविभागप्रमुख, मुंबईतील काही पदाधिकारी कार्यकर्त्यांसह ठाण्यातील प्रवेशावेळी उपस्थित होते. त्या सर्वांचे उपमुख्यमंत्री शिंदे यांनी स्वागत केले. राजापूर शहरातीलही काही उबाठाचे पदाधिकारी साळवी यांच्यासोबत राहिल्याचे दिसत होते.
दरम्यान, ठाकरे गटासह महाविकास आघाडीतील मित्रपक्ष कॉंग्रेसच्याही काही पदाधिकाऱ्यांनी प्रवेश केला. श्री. साळवी यांच्या पक्षप्रवेशामुळे शिवसेनेची (शिंदे गट) राजापूर विधानसभा मतदारसंघातील ताकद वाढणार आहे.
उपजिल्हाप्रमुख संजू साळवीही शिवसेनेत
राजन साळवी यांची जन्मभूमी रत्नागिरी आहे. त्यामुळे त्यांच्या आजच्या शिवसेना प्रवेशामुळे रत्नागिरीतूनही मोठ्या प्रमाणात समर्थक जातील अशी अपेक्षा होती. मात्र त्यांचे बंधू आणि ठाकरे गटाचे उपजिल्हाप्रमुख संजू साळवी हे एकमेव त्यांच्या समर्थनार्थ ठाण्याला गेले आहेत. रत्नागिरीतून अन्य साळवी समर्थक कोणीही गेले नसल्याचे त्यांच्या निकटवर्तीयांकडून सांगण्यात आले. दुसऱ्या टप्प्यात रत्नागिरीतील काही समर्थक प्रवेश करणार असल्याचे सांगण्यात आले.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:45 AM 14/Feb/2025














