बंजारा समाजबांधवांनी एकत्र यावे : अॅड. हुस्नबानू खलिफे

राजापूर : कष्टकरी बंजारा समाजातील मुले-मुली आता उच्च शिक्षण घेण्यासाठी पुढे येत असून, बंजारा समाज सुशिक्षित होत आहे, ही समाधानाची बाब आहे. मात्र बंजारा समाजबांधवांनी आपले प्रश्न सोडविण्यासाठी समाज म्हणून एकत्रित येणे आवश्यक असून, संघटित होऊन स्वतःच्या सर्वांगीण विकासासाठी लढा दिला पाहिजे, असे प्रतिपादन माजी आमदार अॅड. हुस्नबानू खलिफे यांनी येथे केले.

बंजारा बहुउद्देशीय समाज सेवा संघ राजापूर तालुका यांच्या वतीने २८६ व्या संत सेवालाल महाराज जयंती उत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून अॅड. खलिफे बोलत होत्या. शहरातील गुजराळी येथील पाटील मळा येथील यशोदिन सृष्टी हॉलमध्ये बंजारा बहुउद्देशीय समाज सेवा संघाचे अध्यक्ष धनसिंग मानू चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या कार्यक्रमाला व्यासपीठावर माजी आमदार अॅड. हुस्नबानू खलिफे, ठेकेदार संघटनेचे रविकांत भामत, बौद्ध समाजाचे नेते गणपत पन्हळेकर, महिला संघटक ज्योती राठोड, पार्वती राठोड, गिराबाई राठोड, संतोष राठोड उपस्थित होते.

प्रास्ताविक धनसिंग चव्हाण यांनी केले. यावेळी गणपत पन्हळेकर व रविकांत भामत यांनी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन माजी नगरसेवक जितेंद्र मालपेकर यांनी केले. सकाळच्या सत्रात संत सेवालाल महाराजांच्या प्रतिमेसह जकात नाका ते यशोदीन सृष्टी सभागृह अशी मिरवणूक काढण्यात आली.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:43 PM 17/Feb/2025

Tata punch