साडवली : देवरूख शिक्षण प्रसारक मंडळ या संस्थेने उभारलेल्या सृजन सायन्स अॅन्ड इनोव्हेशन अॅक्टिव्हिटी सेंटर या बालविज्ञान केंद्रात ‘विज्ञान बगीचा’ उभारण्यात आला आहे. याचे उद्घाटन उद्योगपती राम भोगले यांच्या हस्ते झाले. विज्ञान प्रसारक सुरेंद्र वैद्य आणि राम भोगले यांनी जीवनातील विज्ञानाचे महत्त्व विद्यार्थ्यांना सांगितले. त्याचप्रमाणे पाध्ये इंग्रजी शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. खंडागळे यांनी मनोगत व्यक्त केले.
या प्रकल्पाबद्दल बोलताना विज्ञान केंद्राचे संस्थापक सदानंद भागवत यांनी सांगितले की, संस्थेने विद्यार्थ्यांच्या विज्ञान विकासासाठी टाकलेले हे आणखी एक पाऊल आहे. लहान मुलांना खेळ खेळण्याबरोबरच विज्ञानदेखील हसत खेळत कळावे हा या विज्ञान बगीचाचा मुख्य उद्देश आहे. आठ गुंठे जागेमध्ये उभारलेल्या या बगीच्यामध्ये १८ वैज्ञानिक खेळणी आहेत, ज्यामध्ये घसरगुंड्या, झोपाळे, तराफा, कप्पी आदी यांत्रिकी विज्ञान समजावणारी खेळणी आहेत. त्याचबरोबर ध्वनी, प्रकाश, दृष्टी आदीमागचे विज्ञान सांगणारोहो खेळणी आहेत.
या बगीच्यातील प्रत्येक खेळण्याच्या बाजूला त्या खेळण्यामागचे विज्ञान स्पष्ट करणारा फलक बसविलेला आहे. सृजन सायन्स सेंटरमध्ये उच्च प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक अशा वयोगटातील विद्यार्थ्यांकरिता विज्ञानाचे अनेक प्रयोग मांडण्यात आले आहेत. त्याचप्रमाणे इलेक्ट्रॉनिक्स, इलेक्ट्रिकल, रोबोटिक्स, श्रीडी प्रिंटिंग फिजिक्स, केमिस्ट्री, बायोलॉजी आदी आठ विषयांच्या प्रयोगशाळा आहेत. विज्ञान बगीचामुळे पूर्व प्राथमिक व कनिष्ठ प्राथमिक मुलांनाही खेळातून विज्ञान शिकण्याची संधी उपलब्ध होणार आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
04:00 PM 17/Feb/2025
