तिथीप्रमाणे शिवजयंती साजरी करण्याचा राजापूर येथील शिवस्मृती मंडळाचा निर्णय

राजापूर : तिथीनुसार शिवजयंती उत्सव साजरा करण्याचा निर्णय राजापूर येथील शिवस्मृती मंडळाने घेतला आहे. त्यानुसार फाल्गुन वद्य तृतीया, सोमवार दि. १७ मार्च २०२५ या तिथीनुसार साजऱ्या होणाऱ्या शिवजयंती उत्सवाच्या नियोजनाची बैठक ग्रामदेवता श्री निनादेवी मंदिरात पार पडली.

या वर्षासाठी मंडळाच्या अध्यक्षपदी दिलीप चव्हाण व खजिनदारपदी अविनाश पाटणकर यांची पुन्हा एकदा सर्वानुमते एक मताने निवड करण्यात आली. सुरवातीला गेल्या वर्षीच्या जमाखर्चाचा आढावा घेण्यात आला. मंडळाची आर्थिक बाजू समाधानकारक असल्याबद्दल उपस्थितांनी समाधान व्यक्त केले.

गेली अनेक वर्षे शिवस्मृती मंडळ आणि राजापूर शिवसेना शाखेच्या संयुक्त विद्यमाने शिवजयंती उत्सव साजरा केला जात होता. शिवस्मृती मंडळाला गेली काही वर्षे शिवसेनेचे सहकार्य आणि योगदान चांगल्या प्रकारे लाभले होते. याबद्दल मंडळाने संघटनेला धन्यवाद दिले. परंतु सध्या महाराष्ट्रात चालू असलेल्या राजकीय परिस्थितीचा विचार करता यावर्षीपासून कोणत्याच राजकीय पक्षाबरोबर संयुक्तरीत्या शिवजयंती उत्सवाचे आयोजन न करता पूर्वीप्रमाणे फक्त तिथीनुसार शिवजयंती उत्सव साजरा करण्याचा निर्णय उपस्थित बैठकीत घेण्यात आला.

राजापूरमध्ये १९८३ मध्ये शिवस्मृती मंडळ स्थापन झाले. छत्रपती शिवराय हे सर्वांचेच आराध्य आणि स्फूर्तिस्थान असल्यामुळे यावर्षीपासून सर्वच राजकीय, सामाजिक, धार्मिक संघटना, स्थानिक मंडळे, संस्था आणि प्रतिष्ठाने यांना सोबत घेऊन शिवस्मृती मंडळाच्या अधिपत्याखाली मोठ्या थाटात शिवजयंती उत्सव साजरा करण्याचे ठरवण्यात आले. याला उपस्थित सर्वांनीच पाठिंबा दर्शविला.

शिवस्मृती मंडळामध्ये जबाबदारी घेऊन शिवकार्य करू इच्छिणाऱ्या नवीन सदस्यांची कार्यकारिणी आणि उत्सवातील विविध समित्या यांची निवड करण्यात २० फेब्रुवारीच्या बैठकीत करण्याचे ठरविण्यात आले. संपूर्ण रत्नागिरी जिल्ह्यात आदर्शवत शिवजयंती साजराी करण्याचा संकल्प यावेळी करण्यात आला, अशी माहिती मंडळाच्या वतीने कार्याध्यक्ष महेश मयेकर यांनी दिली.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:02 20-02-2025