महायुती सरकार ‘लाडकी बहीण’ योजनेतील महिलांची संख्या २५ टक्क्यांवर आणणार : काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार

मुंबई : लाकडी बहीण योजनेवरून विरोधकांचे दावे-प्रतिदावे सुरूच असल्याचे पाहायला मिळत आहे. लोकसभा निवडणुकीत महायुतीला मोठा धक्का बसला होता. यानंतर विधानसभा निवडणुकीपूर्वी महायुती सरकारने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना आणली आणि याची प्रभावी अंमलबजावणी केली.

ही योजना महायुतीसाठी विधानसभा निवडणुकीत गेमचेंजर ठरली आणि न भूतो असे यश मिळाले. परंतु, यानंतर आता या योजनेची छाननी प्रक्रिया सुरू झाली आहे. यावरून आता काँग्रेसने महायुती सरकारवर टीका केली आहे.

लाडकी बहीण योजनेतील लाभार्थी महिलांची संख्या आणखी ९ लाखांनी कमी होणार आहे. याआधी ५ लाख महिलांना या योजनेतून वगळण्यात आलं होते. लाडकी बहीण योजनेमुळे सरकारच्या तिजोरीवर मोठा परिणाम होत असून या योजनेतील अपात्र होणाऱ्या महिलांची संख्या आणखी वाढणार आहे. सरकारकडून लाभार्थी महिलांच्या अर्जाची छाननी केली जात आहे. या योजनेतून अपात्र होणाऱ्या महिलांची संख्या १५ लाखांपर्यंत पोहचण्याचा अंदाज वर्तवण्यात येत आहे. यावरून काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी महायुती सरकावर टीका केली.

महायुती सरकार ‘लाडकी बहीण’ योजनेतील महिलांची संख्या २५ टक्क्यांवर आणणार

प्रसारमाध्यमांशी बोलताना विजय वडेट्टीवार म्हणाले की, निवडणुकीपूर्वी मत विकत घेण्यासाठी सरसकट महिलाना पैसे देण्यात आले, आता सरकार आल्यावर मात्र विविध अटी लावून लाभार्थी महिलांची संख्या कमी केली जात आहे. लाडकी बहीण योजनेतील लाभार्थी महिलांची संख्या ही २५ टक्केपर्यंत आणण्याचे पाप महायुती सरकार करणार आहे, असा दावा करण्यात आला आहे. तसेच निवडणुकीपूर्वी ५ महिन्यांचे आगाऊ पैसे महायुती सरकाने महिलांच्या खात्यांवर जमा केले होते. परंतु, आता या सरकारची नीती भ्रष्ट झाली आहे. या योजनेसाठी तरतूद नव्हती, सरकारकडे पैसे नव्हते तर मते विकत घेण्यासाठी महिलांच्या खात्यावर आगाऊ रकमेचे पैसे टाकले का, असा सवाल वडेट्टीवार यांनी केला. राज्यातील भोळ्या-भाबड्या बहि‍णींना फसवण्याचे महापाप या सरकारने केले आहे, अशी टीका त्यांनी केली.

दरम्यान, राज्यात पुन्हा सरकारमध्ये आल्यास या योजनेतील लाडक्या बहि‍णींना दिले जाणारे पैसे २१०० रूपये दर महिना करू असं आश्वासन महायुतीने दिले होते. महायुती राज्यात पुन्हा सत्तेत आली आहे मात्र निवडणुकीपूर्वी दिलेल्या घोषणेने सरकारवर आर्थिक दबाव वाढला आहे. पुढील महिन्यात राज्याचा अर्थसंकल्प सादर केला जाणार आहे. सध्या योजनेतील अपात्र महिलांना वगळण्याची प्रक्रिया सुरू आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
14:30 20-02-2025