रत्नागिरी: रत्नागिरी रस्ते अपघात सत्र सुरूच असून हातखंबा-रत्नागिरी मार्गावर खेडशी नाक्याजवळ झालेल्या एका भीषण अपघातात एका तरुण विवाहित महिलेचा जागीच दुर्दैवी मृत्यू झाला आहे. ही हृदयद्रावक घटना २२ जून रोजी सकाळी ११.५० च्या सुमारास घडली. या अपघातात मृत महिलेचे पती देखील गंभीर जखमी झाले आहेत. भरधाव वेगाने जाणाऱ्या डंपरने पाठीमागून स्कूटरला जोरदार धडक दिल्यामुळे हा अपघात घडला. या प्रकरणी रत्नागिरी शहर पोलीस ठाण्यात उत्तर प्रदेश/मध्य प्रदेश मूळ रहिवासी असलेल्या डंपर चालकाविरुद्ध गंभीर गुन्ह्यांची नोंद करण्यात आली आहे.
खेडशी नाक्याजवळ भरधाव डंपरची पाठीमागून धडक
पोलिसांकडून मिळालेल्या अधिकृत माहितीनुसार, प्रज्वल प्रमोद पांचाळ (रा. जाकादेवी खालगाव, रत्नागिरी) हे आपली पत्नी प्रांजल प्रज्वल पांचाळ (वय २७) हिला सोबत घेऊन स्कूटरने (क्रमांक एम.एच.०८. ए.डब्ल्यु. ०५६६) हातखंबा येथून रत्नागिरीच्या दिशेने येत होते. खेडशी नाक्याच्या पुढे असलेल्या सुयोग मँगो दुकानासमोरून त्यांची स्कूटर जात असताना, पाठीमागून अत्यंत भरधाव वेगाने आलेल्या एका डंपरने (क्रमांक एम.एच.०८. बी.के.४०९९) त्यांच्या दुचाकीला पाठीमागून जोरदार धडक दिली.
हा अपघात इतका भीषण होता की, स्कूटरवरून फेकल गेल्यामुळे प्रांजल पांचाळ यांना गंभीर दुखापत झाली आणि त्यांचा घटनास्थळीच जागीच मृत्यू झाला. तर त्यांचे पती प्रज्वल पांचाळ हे देखील या धडकेत गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.
डंपर चालकाविरुद्ध नवीन ‘भारतीय न्याय संहिता’ अंतर्गत गुन्हा दाखल
या अपघाताप्रकरणी साहिल रामदास निवळकर (वय २२, रा. देवरुख) यांनी रत्नागिरी शहर पोलीस ठाण्यात रीतसर फिर्याद दिली आहे. डंपर चालक राजेश गणपत विश्वकर्मा (वय ३१, रा. एमआयडीसी रत्नागिरी, मूळ रा. मध्यप्रदेश) याने आपले वाहन सार्वजनिक रस्त्यावर निष्काळजीपणे आणि लोकांच्या जिवाला धोका निर्माण होईल अशा भरधाव वेगाने चालवून हा अपघात केल्याचे फिर्यादीत स्पष्ट नमूद करण्यात आले आहे.
या फिर्यादीवरून रत्नागिरी शहर पोलिसांनी गुन्हा रजिस्टर नंबर १२३/२०२६ नुसार डंपर चालकाविरुद्ध नवीन भारतीय न्याय संहिता (BNS) २०२३ च्या कलम १०६(१), २८१, १२५(अ), १२५(ब) आणि मोटार वाहन कायद्याच्या कलम १८४ अन्वये गुन्हा दाखल केला आहे. या अपघाताचा पुढील अधिक तपास शहर पोलीस करत आहेत.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:10 24-06-2026














