पांगरी बेकायदेशीर उत्खनन प्रकरणी महसूल प्रशासनाची अजब भूमिका; डोंगर पोखरणाऱ्यांवर कारवाई शून्य, ७ कुटुंबांना नोटीस
देवरुख: पांगरी बेकायदेशीर उत्खनन आणि शक्तिशाली भूसुरुंगांच्या स्फोटांमुळे संगमेश्वर तालुक्यातील पांगरी ग्रामपंचायत हद्दीत प्रचंड भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. कोणत्याही वैध शासकीय परवानगीशिवाय राजरोसपणे डोंगरात शक्तिशाली भूसुरुंग लावून बेकायदेशीर उत्खनन केले जात असल्याचा थेट आरोप स्थानिक ग्रामस्थांनी केला आहे. या सुरुंगांच्या तीव्र हादऱ्यांमुळे गावातील अनेक घरांना मोठे तडे गेले असून पाण्याचे नैसर्गिक स्रोत आटले आहेत. धक्कादायक बाब म्हणजे, महसूल प्रशासनाने मूळ खाणमाफियांवर कारवाई करण्याचे सोडून, ज्यांच्या घरांना तडे गेले आहेत अशा ७ मुख्य कुटुंबप्रमुखांनाच घरे खाली करण्याची नोटीस बजावली आहे. प्रशासनाच्या या अजब भूमिकेमुळे पांगरी गावात तीव्र असंतोष पसरला आहे.
जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार, ग्रामसभेत ठराव; तरीही महसूल प्रशासनाचे दुर्लक्ष
पांगरी ग्रामपंचायत व स्थानिक ग्रामस्थांनी एकत्र येऊन २५ मे २०२६ रोजी जिल्हाधिकारी आणि उपविभागीय अधिकारी यांना प्रत्यक्ष भेटून या ठिकाणी सुरू असलेल्या अवैध उत्खननाबाबत रीतसर तक्रार दिली होती. एवढेच नव्हे तर, पांगरी ग्रामसभेत या बेकायदेशीर उत्खननाविरोधात कायदेशीर ठरावही एकमुखाने मंजूर करण्यात आला होता.
प्रशासनाला दिलेल्या पत्रात ग्रामस्थांनी स्पष्ट केले होते की, या बेकायदेशीर सुरुंगांमुळे नागरिकांच्या जीवितास व मालमत्तेस मोठा धोका निर्माण झाला आहे, घरे खचत आहेत आणि धुळीचे प्रदूषण वाढले आहे. परंतु, महसूल प्रशासन आणि पोलिसांनी या गंभीर तक्रारीकडे पूर्णपणे दुर्लक्ष केल्यामुळे संबंधित खाणमाफिया अजूनही बिनदिक्कतपणे सुरुंगांचे स्फोट घडवून आणत आहे, असा थेट आरोप ग्रामस्थांनी केला आहे.
खाणमाफियांना अभय? दरडीचे कारण पुढे करत ग्रामस्थांनाच बजावली नोटीस
या संपूर्ण प्रकरणात १२ जून २०२६ रोजी पांगरी तलाठी कार्यालयाने एक अजब आणि धक्कादायक पाऊल उचलले. तलाठी कार्यालयाने पांगरी गावातील ज्या ७ मुख्य कुटुंबांच्या घरांना सुरुंगांमुळे तडे गेले आहेत, त्यांनाच दरड कोसळण्याची शक्यता वर्तवत लेखी नोटीस बजावली. या नोटीसमध्ये प्रशासनाने म्हटले आहे की, ‘तुमची घरे अगदी दरड प्रवण क्षेत्रात आहेत आणि भविष्यात पाऊस पडल्यास दरड कोसळू शकते. म्हणून तुम्ही तत्काळ घर खाली करून सुरक्षितस्थळी जावे. तसे न केल्यास होणाऱ्या नुकसानास तुम्ही स्वतः जबाबदार राहाल आणि शासनाकडून कोणतीही नुकसानभरपाई मिळणार नाही.’
गावातील निसर्ग उद्ध्वस्त करणाऱ्या आणि लोकांची घरे धोक्यात आणणाऱ्या बेकायदेशीर उत्खनन करणाऱ्या मुख्य व्यक्तीवर गुन्हे दाखल करून त्याचे काम तत्काळ बंद करणे गरजेचे होते. परंतु, मूळ कारणावर व गुन्हेगारावर कारवाई करण्याचे सोडून उलट पीडित ग्रामस्थांनाच नोटीस बजावून प्रशासनाने एक प्रकारे खाणमाफियांना अभय दिल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे.
“पिढ्यानपिढ्यांची घरे सोडून कुठे जायचे?” ग्रामस्थांचा आंदोलनाचा इशारा
“आम्ही आमची पिढ्यानपिढ्यांची घरे सोडून कुठे जायचे? आणि बेकायदेशीर काम करणाऱ्याला प्रशासन पाठीशी का घालत आहे?” असा संतप्त प्रश्न पांगरीतील ग्रामस्थांनी उपस्थित केला आहे. ज्यांच्या घरांना मोठे तडे गेले आहेत, त्यांनाच प्रशासनाने ‘स्वतःच्या जबाबदारीवर सुरक्षित स्थळी जा, अन्यथा जीवितहानीस तुम्हीच जबाबदार राहाल’ असे आदेश काढल्याने ग्रामस्थांमध्ये भीती व संतापाचे वातावरण आहे. प्रशासनाने यावर तत्काळ योग्य ती कायदेशीर कारवाई करून हे उत्खनन कायमचे बंद न केल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा पांगरी ग्रामपंचायत आणि ग्रामस्थांनी दिला आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:57 24-06-2026














