Maharashtra Monsoon Update: ‘मान्सून’ने महाराष्ट्राचा 75 टक्के भाग व्यापला !

२५ आणि २६ जूनला कोकण, नाशिकसह खान्देशात मुसळधार पावसाचा अंदाज

मुंबई: मुंबई पाऊस अपडेट संदर्भात हवामान तज्ज्ञांकडून महत्त्वाची माहिती समोर आली आहे. बहुप्रतीक्षित मान्सून अखेर मुंबईत दाखल झाला असून २२ जून रोजी राज्यातील अनेक भागांत पावसाने जोरदार हजेरी लावली. आज २४ जून रोजी देखील सकाळी अनेक भागात मध्यम स्वरूपाचा पाऊस कोसळत आहे. मान्सूनने आतापर्यंत मुंबई, ठाणे, पालघर, नाशिक, छत्रपती संभाजीनगर, बीड, नांदेड, परभणी, जालना, बुलढाणा, वाशिम, वर्धा, यवतमाळ, चंद्रपूर आणि गडचिरोली या जिल्ह्यांमध्ये हजेरी लावत सुमारे ७५ टक्के महाराष्ट्राचा भाग व्यापला आहे. खान्देशसहित उर्वरित २५ टक्के महाराष्ट्र व्यापण्यासाठी सध्या पोषक आणि अनुकूल परिस्थिती निर्माण झाली आहे.

२५ आणि २६ जूनला कोकण आणि खान्देशात जोरदार पावसाची शक्यता

भारतीय हवामान विभागाचे (IMD) पुणे येथील निवृत्त हवामान तज्ज्ञ माणिकराव खुळे यांनी वर्तवलेल्या अंदाजानुसार, मान्सून पोहोचलेल्या वरील सर्वच ठिकाणी अद्याप पावसाने सक्रिय हजेरी लावली नसली, तरी मान्सूनचे वारे मात्र तेथपर्यंत पोहोचले आहेत. यामुळे गुरुवार आणि शुक्रवार म्हणजेच २५ व २६ जून रोजी संपूर्ण कोकण किनारपट्टी, नाशिक जिल्हा आणि संपूर्ण खान्देश परिसरामध्ये जोरदार पावसाची शक्यता जाणवत आहे. या पार्श्वभूमीवर नागरिकांनी आणि विशेषतः शेतकऱ्यांनी आवश्यक ती खबरदारी घ्यावी, असा सल्ला देण्यात आला आहे.

विदर्भात पुढील दोन दिवस उष्णतेची तीव्र लाट कायम

दुसरीकडे, विदर्भात मान्सूनचे आगमन झाले असले, तरी आजपासून पुढील २ दिवस म्हणजेच शुक्रवार २६ जूनपर्यंत विदर्भात भाग बदलत उष्णतेची तीव्र लाट जाणवणार आहे. विदर्भातील नागरिकांना मान्सूनच्या आगमनानंतरही पुढील दोन दिवस तीव्र उष्णतेचा सामना करावा लागणार आहे. मात्र, दिलासादायक बाब म्हणजे या काळात रात्रीचा उकाडा काही प्रमाणात कमी होईल, अशी शक्यता हवामान तज्ज्ञ माणिकराव खुळे यांनी वर्तवली आहे. उर्वरित महाराष्ट्रात मात्र मान्सूनच्या प्रगतीमुळे हवेत गारवा निर्माण होण्यास सुरुवात झाली आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:24 24-06-2026