चिपळूण : विधवा महिला तमेच दिव्यांग बांधवांना रोजगाराची साधने निर्माण होण्यासाठी शहरालगतच्या धामणवण ग्रामपंचायतीकडून मदतीचा हात देण्यात आला, विधवा तसेच गरजू महिलांना शिवणकामासाठी शिलाई मशीन, तर दिव्यांग बांधवांना विविध वाहनांमध्ये हवा भरण्यासाठी आवश्यक मशीन देण्यात आली.
सरपंच सुनील सावंत हे गावात विविध विधायक उपक्रम राबवत आहेत. विधवा महिलांना त्यांनी ध्वजवंदनाचा मान दिला होता, महिला तसेच दिव्यांग बांधवांना रोजगार मिळण्यासाठी ग्रामपंचायतीच्या माध्यमातून साधनांचा पुरवठा करण्यात आला.
यामध्ये गावातील विधवा तसेच गरजू महिलांना शिवणकामासाठी शिलाई मशीन उपलब्ध करून देण्यात आली. वाहनांमध्ये हवा भरण्याची मशीन उपयुक्त ठरते. दिव्यांग बांधव हा व्यवसाय सुलभतेने करू शकतात, याकरिता दिव्यांग बांधवांना हवा भरण्याची मशीन देण्यात आली. याशिवाय शाळा, अंगणवाडीत शुद्ध पाणीपुरवठ्यासाठी फिल्टरची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली. विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य देण्यात आले. विद्यार्थ्यांना विविध प्रकारच्या खेळण्यांचा पुरवठा करण्यात आला.
चिपळूण शहराजवळच गाव असल्याने येथील लोकवस्ती वाढत आहे. त्यामुळे भविष्यात गरज ओळखून कचरा गोळा करण्यासाठी घंटागाडी घेण्यात आली. या घंटागाडीच्या माध्यमातून गावातील कचरा संकलित केला जाणार आहे. साहित्याचे वितरण करताना सरपंच सुनील सावंत, उपसरपंच विजया बरेकर, सदस्या पूजा लाड, जयश्री लाड, रिया सावंत, दीप्ती उंडरे, माजी सरपंच विश्वास वाजे सोसायटी अध्यक्ष सुभाष जाधव, ग्रामपंचायत अधिकारी विलास कदम यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते, ग्रामस्थ व महिला उपस्थित होत्या.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:21 AM 21/Feb/2025
