◼️ कामात दिरंगाई झाल्यास काम काढून घेण्याचा इशारा
रत्नागिरी : गेली अनेक वर्षे रखडलेल्या मुंबई-गोवा महामार्गाची पाहणी राज्याचे सार्वजनिक बांधकाममंत्री शिवेंद्रराजे भोसले यांनी केली. गुरुवार व शुक्रवार असे दोन दिवस त्यांनी ही पाहणी केली. महामार्गाच्या रस्त्याचे व पुलांची कामे लवकरात लवकर पूर्ण करण्याच्या सूचना आपण ठेकेदार कंपन्यांना दिल्या आहेत. जे ठेकेदार कामात हलगर्जीपणा करतील, त्यांच्याकडून ठेके काढून घेतले जातील, असा इशाराही मंत्र्यांनी पत्रकारांशी बोलताना दिला आहे.
शुक्रवारी शिवेंद्रराजे भोसले यांनी महामार्गाच्या कामांबाबत सार्वजनिक बांधकामच्या विश्रामगृहावर आढावा घेतला. कोणत्या टप्प्यात किती कामे शिल्लक आहेत. ती कामे पूर्ण करण्यासाठी किती कालावधी लागेल, याची माहिती अधिकार्यांकडून जाणून घेतली. महामार्गावरील किती पुलांची कामे सुरू आहेत. याचाही आढावा घेतला. यावेळी राजापूरचे आमदार किरण ऊर्फ भैया सामंत उपस्थित होते. त्यांनीही कामांमधील त्रुटी व सद्यस्थितीबाबत मंत्र्यांशी चर्चा केली.
यानंतर पत्रकारांशी ना. शिवेंद्रराजे भोसले यांनी संवाद साधला. मुंबई गोवा महामार्गाचे काम लवकर व वेगाने होण्यासाठी प्रयत्न सुरु असल्याचे त्यांनी सांगितले. ज्या भागातील कामे रखडली आहेत. ती लवकर पूर्ण होण्याकडे कटाक्षाने लक्ष देण्यात येत आहे. मागील दोन वर्षात महामार्गाच्या कामाचा वेग वाढला आहे. रस्त्यासह पुलांची कामेही सुरु आहेत. लवकरात लवकर ही कामे पूर्ण होतील,असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला. मे महिन्यापर्यंत जास्तीतजास्त काम पूर्ण होईल, यासाठी प्रयत्न सुरु असल्याचे त्यांनी सांगितले. कामे वेगाने होण्यासाठी ठेकेदाराने कामगारांची संख्या वाढवावी म्हणून सूचनाही दिल्या असल्याचे ना. भोसले यांनी सांगितले.
महामार्गाच्या कामांच्या बाबतीत दिरंगाई झाल्यास काम काढून घेण्याच्या प्रस्तावाचा विचार केला जाणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. या कामावर राष्ट्रीय महामार्गाच्या अधिकार्यांसह सार्वजनिक बांधकामाच्या अधिकार्यांनाही लक्ष ठेवण्यास सांगितले असल्याचे त्यांनी सांगितले. ज्या ठेकेदारांनी रॉयल्टी थकवली आहे, त्यांच्या बिलांमधून ती वसुल केली जाणार असल्याचेही ना. भोसले यांनी स्पष्ट केले.
जिल्ह्यासह राज्यातील कंत्राटदारांचे पैसे लवकर मिळतील, यासाठी आपले प्रयत्न असून, मार्च पर्यंत पैसे मिळतील, असेही त्यांनी स्पष्ट केले. कशेडी बोगद्यातील गळती काढण्याचे काम सुरु असून मार्चपर्यंत कशेडी बोगदा वाहतुकीसाठी पूर्ण क्षमतेने सुरु होईल, असे त्यांनी सांगितले.
हातखंबा ते वाकेडपर्यंत पाहणी
शुक्रवारी दुसर्या दिवशी मंत्री शिवेंद्रराजे भोसले, आमदार किरण सामंत यांनी हातखंबा ते वाकेड या भागाची पाहणी करीत अधिकार्यांकडून माहिती घेतली, हातखंबा, पाली, लांजा येथील ब्रिजच्या कामाबाबत ना. भोसले यांनी अधिकार्यांना सूचना केल्या.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:15 22-02-2025
