राजापूर : पाचल बाजारपेठेत प्रक्षोभक वक्तव्य केल्याप्रकरणी एकास अटक

राजापूर : पाचल बाजारपेठेत दोन समाजात तेढ निर्माण होईल, अशी वक्तव्ये करणाऱ्या शमशुद्दीन गुलाब ताजी (३५, रहाणार कोळपे, वैभववाडी) याच्यावर राजापूर पोलिसांनी गुन्हा दाखल करून त्याला अटक केली आहे. त्याला शुक्रवारी येथील न्यायालयासमोर हजर करण्यात आले होते. दरम्यान, त्या घटनेनंतर पाचल परिसरात काही काळ तणाव निर्माण झाला होता. नंतर तो निवळला.

ही घटना गुरुवारी (दि. २० फेब्रुवारी) रात्री नऊच्या दरम्यान घडली. या बाबत पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार शमशुद्दीन गुलाब ताजी हा पाचल येथे कामानिमित्त आला होता. पाचल बाजारपेठेत इकडे तिकडे फिरताना तो आढळून आला. बाजारपेठेत अनोळखी माणूस फिरत असल्याचे आढळून आल्याने पाचल येथील काही ग्रामस्थांनी विचारणा केली असता, त्याने अरेरावीची भाषा
वापरून दोन समाजात तेढ निर्माण होईल, अशी वादग्रस्त वक्तव्ये केली. त्यामुळे काही काळ पाचल बाजारपेठेत तणाव निर्माण झाला होता. जनभावना संतप्त बनल्या होत्या. सुदैवाने पोलिस यंत्रणा त्वरित घटनास्थळी पोहचली आणि त्यांनी त्वरीत शमशुद्दीन ताजी याला ताब्यात घेतले. त्या नंतर त्याला रायपाटण पोलिस दूरक्षेत्र कार्यालय येथे आणण्यात आले.

दरम्यान, या घटनेची खबर मिळताच राजापूरचे पोलिस निरीक्षक राजाराम चव्हाण हे देखील रायपाटणला दाखल झाले. दोन समाजात तेढ निर्माण होईल, असे प्रक्षोभक वक्तव्य केल्याप्रकरणी शमशुद्दीन गुलाब ताजी याच्या विरुध्द राजापूर पोलिसांनी ३५३ (२) नुसार गुन्हा दाखल केला आहे.

या प्रकरणी पोलिस उपनिरीक्षक सुधीर उबाळे यांच्याकडे तपास देण्यात आला आहे. शुक्रवारी त्याला राजापूर येथील प्रथम वर्ग न्यायालयात हजर करण्यात आले होते.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:47 AM 22/Feb/2025