दापोली आगारातून तुळजापूर, नांदेड बसफेरीच्या मागणीकडे दुर्लक्ष

दापोली : एसटी महामंडळाने प्रवाशांच्या मागणीचा विचार न करण्याचा सपाटा लावला आहे. तुळजापूर किंवा नांदेड अशी बस सुरू करण्याची मागणी असतानाही परिवहन विभागाच्या रत्नागिरी विभागीय अधिकाऱ्यांनी धुळे बस सुरू केली. यावर एसटीचा कारभार हा ‘जखम मांडीला, मलम शेंडीला’ अशा प्रकारचा असल्याचे स्पष्ट झाले आहे. नव्याने सुरू केलेल्या एसटी बसचा लाभ येथील प्रवाशांना होणार नाही, असे मत प्रवाशांनी व्यक्त केले.

दापोली आगरातून गेली काही वर्षे उस्मानाबाद, नांदेड या जिल्ह्यांना जोडणारी थेट सेवा सुरू करण्याची प्रवासी संघटनांची मागणी होती.

त्याप्रमाणे तुळजापूर मार्गावर दोन बस सुरूही झाल्या; मात्र दापोली आगारातून त्या बसच्या वेळेतच खेड आगारातून नांदेड बस सुरू केली आहे. खेड आगारातून सुरू झालेली बससेवा दापोलीतून सुरू व्हावी, अशी प्रवासी संघटनेने केली होती; मात्र त्याला एसटीच्या अधिकाऱ्यांनी वाटाण्याच्या अक्षता लावल्या. दापोली हे पर्यटनदृष्ट्या महत्वाचे शहर असून, येथील अनेक कर्मचारी हे नांदेड लातूर, उस्मानाबाद या जिल्ह्यातील आहेत.

त्यामुळे या सर्व शासकीय कर्मचाऱ्यांच्या सोयीसाठी दापोलीतून बससेवा सुरू होणे गरजेचे होते; मात्र ते न करता खेड, चिपळूण व गुहागर या आगारातून दापोली आगाराच्या बसच्या पुढे बससेवा सुरू केल्या जात आहेत. याबाबत अधिकाऱ्यांना विचारणा केली असता त्यांनी दापोली आगारावर मुंबईकडेचा भार असून प्रवाशांनी मागणी केल्यास मुंबईकडे जाणाऱ्या फेऱ्या सुरू करण्यात येतील, असे सांगितले. त्यानुसार प्रवासी संघटनांनी बंद असलेली पाजपंढरी-मुंबई, उवरघर-मुंबई व भडवळे-मुंबई या बसची मागणी केली. संबंधित ग्रामपंचायतींनी याबाबतचे मागणी पत्रही प्रशासनाला दिले आहे; मात्र एसटी प्रशासन त्याकडे दुर्लक्ष करत असल्याने प्रवासी संघटनेच्या मागणीला एसटीच्या अधिकाऱ्यांनी केराची टोपली दाखवली आहे.

फेऱ्या सुरू करण्याची मानसिकता हवी केळकर
दापोली आगार हे जिल्ह्यातील शेवटच्या टोकातील आगार आहे. तिथे परजिल्ह्यातील विविध शासकीय कार्यालयात कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांची संख्याही जास्त आहे. त्यामुळे दापोली आगारातून अन्य आगारांशी जोडून बसफेऱ्या चालवणे गरजेचे आहे. दापोलीकरांची तुळजापूर, दुपारी १ ची पुणे, पाजपंढरी कफरेड या बसची अनेक वर्षांची मागणी असून, या फेऱ्या सुरू करणे प्रशासनाची मानसिकता असेल तर सहजशक्य आहे, असे दापोली मंडणगड प्रवासीमित्र संघटनेचे अध्यक्ष शैलेंद्र केळकर यांनी सांगितले.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:31 PM 22/Feb/2025