सवलतींमुळे एसटीला रोज तीन कोटींचा तोटा : परिवहनमंत्री प्रताप सरनाईक

धाराशिव : “राज्य परिवहन महामंडळाच्या (एसटी) बस तिकीट दरात लाडक्या बहिणींना ५० टक्के सवलत, तसेच ७५ वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांनाही सवलत आहे. विविध सवलतींमुळे बससेवा दरदिवशी तीन कोटी रुपयांनी तोट्यात जात आहे. सगळ्यांनाच सवलती देत बसलो तर ही सेवा चालविणे कठीण होईल,” असे मत राज्याचे परिवहनमंत्री प्रताप सरनाईक यांनी व्यक्त केले.

धाराशिव येथे आयोजित एका कार्यक्रमात परिवहनमंत्री सरनाईक बोलत होते. याच कार्यक्रमादरम्यान आणखी काही घटकांनी एसटी बस सेवेत सवलत देण्याची मागणी त्यांच्याकडे केली. त्यावेळी यापुढे एसटीच्या सेवेत आणखी सवलती देणे शक्य नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. सरनाईक म्हणाले,” सध्या तरी अन्य काही सवलतींच्या मागणीचा विचार करू शकत नाही. एसटीची सेवा तळागाळातील घटकांपर्यंत पोचते. ‘एसटी (प्रवर्ग) तिथे एसटी’ ही माझी संकल्पना आहे. आमचा आदिवासी, ‘एसटी’ प्रवर्गातील बांधव गाव, खेड्या-पाड्यांमध्ये, डोंगर, दऱ्यांमध्ये राहतो. त्या ठिकाणी एसटी सेवा पोहोचली पाहिजे, या मताचा मी आहे. त्यादष्टीनेच प्रयत्न सुरू राहतील.”

सवलतींचा वर्षाव
‘एसटी’तर्फे तब्बल ३२ सवलती
त्यात अधिक सवलती १०० टक्के, काही ५०, ३३, ६६ टक्के
महिला सन्मान योजनाः ५० टक्के
विविध शाळांच्या सहलींसाठी: ५० टक्के
अंध व अपंग व्यक्तींना: ७५ टक्के
शासन पुरस्कृत खेळांतील विजेत्यांना: ३३.३३ टक्के
शंभर टक्के मोफत प्रवास योजनेत ७५ वर्षांवरील ज्येष्ठ नागरिक,
स्वातंत्र्य सैनिक व त्यांचे साथीदार, हुतात्मा जवानांच्या वीरपत्नी, पाचवी ते बारावीपर्यंत शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थिनी
सिकलसेल, एड्सग्रस्त, किडनी आजारात डायलिसिसवरील रुग्ण, हिमोफिलियाचे रुग्ण आदींचा समावेश आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:43 PM 22/Feb/2025