गुहागर : राज्यामध्ये राष्ट्रीय शिक्षण धोरण 2020 ची अंमलबजावणी सुरू असून शिक्षकांच्या क्षमता वृद्धीसाठी जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेमार्फत क्षमता वृद्धी प्रशिक्षण आयोजित केले असून त्यामुळे शिक्षकांची क्षमता बांधणी होऊन शालेय शैक्षणिक गुणवत्ता वाढ होईल, जागतिक स्तरावर विविध क्षेत्रांमध्ये होणाऱ्या आमुलाग्र बदलांचा विचार करता नवनवीन आव्हानांना सामोरे जाण्यासाठी विद्यार्थी आणि शिक्षक सक्षम होतील असे प्रतिपादन गुहागर पंचायत समितीचे गटशिक्षणाधिकारी रायचंद गळवे साहेब यांनी केले.
कनिष्ठ महाविद्यालय अबलोली येथे दुसऱ्या टप्प्यातील तालुकास्तरीय शिक्षक क्षमता वृद्धी प्रशिक्षण अत्यंत उत्साह पूर्ण वातावरणात सुरू आहे. सदर प्रशिक्षणाला त्यांनी भेट देऊन प्रशिक्षणार्थ्यांशी सुसंवाद साधला. त्यावेळी केंद्र संचालक तथा अबलोली प्रभागाचे शिक्षण विस्तार अधिकारी विश्वास खर्डे साहेब, गुहागर बीटाचे विस्तार अधिकारी श्री केशव क्षीरसागर साहेब, विषय शिक्षक परमेश्वर लांडे, विषय शिक्षक शिवानंद साखरे तसेच साधन व्यक्ती प्रताप देसले, सुनील गुडेकर, मनोज पाटील, अर्जुन किन्होळकर, रविकांत वाकडे, नितीन जगताप, पराग कदम, भूषण बागल, सुनील साळुंखे, विजय पिसाळ, नरेंद्र देवळेकर आदी मान्यवर उपस्थित होते.
सदर प्रशिक्षणाच्या माध्यमातून राष्ट्रीय शिक्षण धोरण 2020, राज्य अभ्यासक्रम आराखडा पायाभूत स्तर 2023, राज्य अभ्यासक्रम आराखडा शिक्षण 2024, शाळा गुणवत्ता मूल्यांकन व आश्वासन आराखडा, क्षमता आधारित अध्ययन व अध्यापन प्रक्रिया, क्षमता आधारित मूल्यांकन कार्य नीती, क्षमता आधारित प्रश्न निर्मिती कौशल्य, विविध गटकार्य, समग्र प्रगती पत्र इत्यादी विषयांवर मार्गदर्शन केले जात आहे. प्रशिक्षणातील प्रशिक्षणार्थ्यांची शिस्त व शंभर टक्के उपस्थिती यांचे त्यांनी कौतुक केले. गुहागर तालुका शैक्षणिक गुणवत्ता क्षेत्रामध्ये आघाडीवर राहावा यासाठी सर्व शिक्षकांनी कटिबद्ध राहावे असे त्यांनी आवाहन केले.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
03:00 PM 22/Feb/2025
