रत्नागिरी : रत्नागिरी तालुक्यातील पोमेडी खुर्द (काजरघाटी) येथे खार प्रतिबंधक बंधाऱ्याच्या कामाला सुरुवात झाली आहे. सोमेश्वर पुलापासून या बंधाऱ्याचे काम केले आहे. यामुळे काजरघाटी येथील सुमारे ४० एकरच्या शेतजमिनीला संरक्षण मिळणार आहे. खाऱ्या पाण्यामुळे येथील अर्धेअधिक क्षेत्र नापिक झाले होते. या बंधाऱ्यामुळे येथील सुमारे १०० शेतकऱ्यांना दिलासा मिळणार आहे.
गेली अनेक वर्षे या बंधाऱ्याच्या कामासाठी पाठपुरावा सुरू होता. येथील सुमारे १०० शेतकरी भाताबरोबरच नारळ, सुपारी, कुळीथ, पावटा, कडवा, मूग, वाल, चवळी आदीचे मोठ्या प्रमाणात उत्पादन घेत होते. मात्र काजळी नदीत साचलेला गाळ आणि नदीकिनाऱ्याची झालेली धूप यामुळे मोठ्या प्रमाणात भरतीच्यावेळी पाणी शेतजमिनीत घुसून येथील जमीन नापिक झाली. त्यामुळे अनेक शेतकऱ्यांनी शेती करणे सोडले आहे. येथील भात पिकावरोबरच पिकणाऱ्या कडधान्यांमुळे येथील शेतकऱ्यांचा उदरनिर्वाह होत असे.
मात्र खाऱ्या पाण्यामुळे कडधान्याचे उत्पादन होत नसल्याने शेतकऱ्यांनी शेती करणेच सोडून दिले. त्यामुळे येथे खाऱ्या पाण्यापासून संरक्षण करण्यासाठी नदीकिनारी खार प्रतिबंधक बंधारा बांधण्याची मागणी केली जात होती. अनेक वर्षे त्याना पाठपुरावा सुरू होता. अखेर आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाऱ्या बैठकीत या खार बंधाऱ्याला मंजुरी देण्यात आली. सुमारे १९०० मीटरचा हा बंधारा संपूर्ण नदीकिनारी बांधला जाणार आहे. त्यासाठी ७ कोटी २ लाखांचा निधी मंजूर झाला आहे, या बंधाऱ्याच्या कामाला प्रामस्थांसह शेतकऱ्यांच्या उपस्थितीत सुरुवात करण्यात आली.
काजळी नदीतील गाळ उपसा गरजेचा
दरम्यान, सोमेश्वर पुलापासून गुरमळीपर्यंत सोमेश्वर आणि काजरघाटी या दोन्ही बाजूला काजळी नदी गाळाने भरली आहे. त्यामुळे भरतीच्यावेळी नदीकिनाऱ्यावरून पाणी शेतजमिनीत येते. त्यामुळे अनेकवेळा भातशेती आणि कडधान्य पिकात घुसून यापूर्वी नुकसान झाले आहे. या ठिकाणचा गाळ उपसा झाल्यास येथे नदीपात्र खोल होण्यास मदत होणार आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:09 PM 24/Feb/2025














