डोंगर उतारावरील जमिनीला पडल्या भेगा; ८ कुटुंबांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर, महसूल प्रशासनाकडून पाहणी
खेड: Khed Apede Landslide Threat म्हणजेच खेड तालुक्यात गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे भूस्खलन, दरडी कोसळणे आणि जमिनीला तडे जाण्याच्या चिंताजनक घटनांमध्ये वाढ होत आहे. अशातच तालुक्यातील आपेडे गावातील मोरेवाडी येथे जमिनीला भल्यामोठ्या भेगा पडल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. यामुळे डोंगर उताराच्या खाली असलेल्या १५ घरांवर दरड कोसळण्याचा थेट धोका निर्माण झाला असून, संपूर्ण मोरेवाडी परिसरात कमालीचे भीतीचे वातावरण पसरले आहे. घटनेची माहिती मिळताच महसूल प्रशासनाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेऊन परिस्थितीचा सविस्तर आढावा घेतला आहे.
सुलोचना मोरे व सखाराम मोरे यांच्या घराच्या वरच्या बाजूला भेगा
मिळालेल्या माहितीनुसार, आपेडे मोरेवाडीतील सुलोचना गणपत मोरे आणि सखाराम मोरे यांच्या घराच्या वरच्या बाजूस असलेल्या डोंगर उतारावरील जमिनीला मोठ्या प्रमाणात तडे गेले आहेत. सातत्याने पडणाऱ्या मुसळधार पावसामुळे येथील डोंगराची माती आणि जमिनीची पकड सैल झाली असून, या भेगा दिवसेंदिवस अधिक रुंदावत चालल्याचे स्थानिक ग्रामस्थांनी सांगितले. या संवेदनशील ठिकाणी जर मोठी दरड कोसळली, तर खालील बाजूस वसलेल्या संपूर्ण मोरेवाडीला त्याचा भीषण फटका बसण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे.
मोरेवाडीतील ८ घरांमध्ये नागरिक वास्तव्यास; सतर्कतेचा इशारा
मोरेवाडीमध्ये एकूण १५ घरे आहेत, ज्यापैकी सद्यस्थितीत ८ घरांमध्ये नागरिक प्रत्यक्ष वास्तव्यास आहेत, तर उर्वरित घरे बंद आहेत. संभाव्य भूस्खलनाचा धोका लक्षात घेता या निवासी नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला आहे. प्रशासनाकडून मिळालेल्या माहितीनुसार, अद्याप तात्काळ स्थलांतराची वेळ आलेली नसली तरी, महसूल प्रशासनाने येथील सर्व नागरिकांना चोवीस तास अत्यंत सतर्क राहण्याच्या सूचना दिल्या आहेत. तसेच परिस्थिती बिघडल्यास किंवा आवश्यक वाटल्यास तातडीने सुरक्षित स्थळी स्थलांतरित होण्याचे आवाहनही करण्यात आले आहे.
प्रांताधिकारी वैशाली पाटील यांच्याकडून घटनास्थळाची पाहणी
आपेडे येथील मोरेवाडीत जमिनीला मोठ्या प्रमाणात तडे गेल्याचे वृत्त समजताच महसूल यंत्रणा ॲक्शन मोडमध्ये आली आहे. प्रांताधिकारी वैशाली पाटील, तहसीलदार सुधीर सोनवणे आणि मंडळ अधिकारी उमाकांत देशमुख यांनी मोरेवाडीला प्रत्यक्ष भेट देऊन धोक्याची तीव्रता तपासली. अधिकाऱ्यांनी परिस्थितीची गंभीर दखल घेत संबंधित विभागांना तातडीने आवश्यक त्या सर्व संरक्षणात्मक उपाययोजना करण्याचे आदेश दिले आहेत. तसेच, या संपूर्ण परिसरावर महसूल विभागाकडून आता सातत्याने आणि बारकाईने लक्ष ठेवण्यात येत आहे
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:30 10-07-2026














