खेड-दापोली मार्गावरील वणवा आटोक्यात

खेड : खेड दापोली मार्गावरील योगिता दंत महाविद्यालयाच्या पाठीमागे लागलेला वणवा येथील नगर परिषदेच्या अग्निशमन दलातील कर्मचाऱ्यांनी अथक प्रयत्नाने आटोक्यात आणला. त्यामुळे लगतच्या आंबा बागायतींना पोहचणारा धोका वेळीच टळला.

योगिता दंत महाविद्यालयाच्या पाठीमागे वणवा लागल्याची माहिती मिळताच खेड नगरपरिषद अग्निशमन दलाचे फायरमन श्याम देवळेकर, दीपक देवळेकर, वाहन चालक विद्याधन पवार, सहाय्यक फायरमन प्रणय रसाळ यांनी तातडीने घटनास्थळी पोहचून वणवा आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्नांची परिकाष्ठा केली.

मदतीसाठी योगिता दंत महाविद्यालयातील कर्मचारीही धावून आले. रणरणत्या उन्हामुळे वणव्याने रौद्ररूप धारण केल्याने आंबा बागायतींना मोठा धोका पोहोचण्याची दाट शक्यता निर्माण झाली होती. अखेर अग्निशमन दलातील कर्मचाऱ्यांनी वणव्यावर नियंत्रण मिळवले.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:26 AM 27/Feb/2025