चिपळूण : ‘जल्लोष लोककलेला‘ आजपासून प्रारंभ अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेची घटक संस्था असणाऱ्या बालरंगभूमी परिषद मुंबई आयोजित आणि बालरंगभूमी परिषद शाखा रत्नागिरी संयोजित शहरातील इंदिरा गांधी सांस्कृतिक केंद्रात आज ४ व ५ ऑक्टोबर असे दोन दिवस जल्लोष लोककलेचा या महाराष्ट्रातील लोककलांवर आधारित कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. रत्नागिरी शाखा संयोजक असलेल्या या कार्यक्रमात नृत्य, वादन व गायन अशा प्रकारात जिल्ह्यातील विविध शाळांच्या बाल कलाकारांची स्पर्धा होणार आहेत.
चिपळूण नगर पालिका ते इंदिरा गांधी सांस्कृतिक केंद्र अशा दिंडीनंतर अभिनेत्री आणि बालरंगभूमी परिषद मध्यवर्ती कार्यालयाच्या अध्यक्षा निलम शिर्के आणि चिपळुणातील लोककला क्षेत्रातील ज्येष्ठ लोककलावंत दत्ताराम भोजने यांच्या उपस्थितीत उद्घाटन होणार आहे. दि. ४ व ५ ऑक्टोबर रोजी सकाळी दहा वाजल्यापासून इंदिरा गांधी सांस्कृतिक केंद्रात लोककलेचा जल्लोष सुरू होईल.
तत्पूर्वी सकाळी शालेय विद्यार्थ्यांची चिपळूण नगर परिषद ते इंदिरा गांधी सांस्कृतिक केंद्र अशी दिंडी काढण्यात येईल. या लोककला महोत्सवात समूह नृत्य, समूह गायन, एकल गीत, एकल नृत्य, एकल वाद्य वादन अशा स्पर्धांचा महोत्सव होणार आहे. रत्नागिरी जिल्हा शाखेचे अध्यक्ष नंदू जुवेकर, कार्याध्यक्ष ओंकार रेडीज यांच्यासह जिल्हा कार्यकारिणीचे पदाधिकारी, सदस्य आणि सभासद या महोत्सवाच्या यशस्वीतेसाठी प्रयत्न करीत आहेत. अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद शाखा चिपळूणचेही महत्त्वाचे सहकार्य या महोत्सवाच्या आयोजनात असून, स्थानिक शिक्षण विभागासहित चिपळूण नगर परिषदेचे सहकार्य लाभत आहे.
रंगकर्मी, विद्यार्थी, शिक्षक, पालक यांनी या लोककला महोत्सवामध्ये सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हा शाखेच्या वतीने करण्यात आले आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:37 AM 04/Oct/2024
