खेड : महावितरणकडून थकबाकीदारांवर वसुली कारवाईची मोहीम

खेड : महावितरणच्या उपविभागांतर्गत थकित वीज ग्राहकांना वीजबिले भरणा करण्यासंदर्भात सातत्याने सूचना देवूनही कानाडोळा करणाऱ्या थकबाकीदारांवर महावितरणच्या वसुली पथकांनी कारवाईची मोहीम हाती घेतली आहे. उपविभागांतर्गत दिवसाला १५० हून अधिक ग्राहकांचा वीजपुरवठा खंडित केल्याची बाब समोर आली आहे. वीजपुरवठा खंडित खंडित केल्यानंतर तातडीने वीजबिले भरणा केला जात असल्याची माहिती महावितरणकडून देण्यात आली.

गेल्या आठवडाभरापासून महावितरणने कारवाईची मोहीम तीव्र केली आहे. पथकांमार्फत खेड शहर उपविभागातील भरणे, भोस्ते, दापोली रोड, शिवतररोड आदी भागात दिवसाला ५० ते ६० थकित ग्राहकांचा वीजपुरवठा खंडित करावा लागत असल्याची बाब समोर आली आहे. वीजपुरवठा खंडित केल्यानंतर ग्राहक तातडीने वीजबिले भरणा करण्यावर भर देत आहेत. तर काही ग्राहकांकडून बिलांबाबत विचारणा करण्यासाठी जाणाऱ्या वसुली पथकातील कर्मचाऱ्यांशी शाब्दिक वाद घालण्याचे प्रकार सुरू आहेत. शहरातील एका ग्राहकाकडे थकित बिल भरणा करण्याबाबत विचारणा करण्यासाठी गेलेल्या दोन कर्मचाऱ्यांना धक्काबुक्कीचा प्रकार समोर आला.

या प्रकारानंतर महावितरणचे सर्व वीज कर्मचारी एकटवले. सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यासाठी कर्मचारी गेले होते. यादरम्यान, त्या थकित ग्राहकाने महावितरणच्या कर्मचाऱ्यांची माफी मागत वीजबिल देखील तातडीने भरणा केले. यामुळे या प्रकरणावर पडदा पडला.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
02:07 PM 27/Feb/2025