चिपळूण : येथील नवकोंकण एज्युकेशन सोसायटीच्या डीबीजे महाविद्यालयाच्या मराठी विभागातर्फे मराठी भाषा गौरव दिनानिमित्त घेण्यात आलेल्या उत्सव माय मराठीचा उपक्रम घेण्यात आला. याअंतर्गत काव्यमैफिलीचे उद्घाटन नवकोकण एज्युकेशन सोसायटीचे खजिनदार संजीवन खरे यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी खरे यांनी उत्सव माय मराठीचे भरभरून कौतुक केले. तसेच विद्यार्थ्यांना आपल्या भावना, विचार, वेदना व्यक्त करण्यासाठी एक स्वतंत्र मंच उपलब्ध असायला हवा. तिथे आपल्या विचारांची आणि भावनांची खदखद व्यक्त करता येईल आणि तो मंच उत्सव माय मराठीने उपलब्ध करून दिला आहे, असे त्यांनी सांगितले. काव्य मैफिलीसाठी महाविद्यालयाचे प्रबंधक अनिल कलकुटकी, महाराष्ट्र साहित्य परिषदेचे अध्यक्ष संतोष गोनवरे, कनिष्ठ महाविद्यालयाच्या पर्यवेक्षिका स्नेहल कुलकर्णी व ज्येष्ठ रंगकर्मी कांता कानिटकर उपस्थित होते. या काव्यमैफिलीत २२ विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला. महाविद्यालयातील शिक्षकांनीही आपल्या कविता सादर केल्या.
या उपक्रमासाठी भूगोल विभागाचे डॉ. राहुल पवार, प्रा. प्रतीक्षा मोहिते, अर्थशास्त्र विभागाचे प्रमुख प्रा. सुरेश नामदास, इंग्रजी विभाग प्रमुख डॉ शिल्पा सप्रे, प्राणीशास्त्र विभागाचे प्रमुख प्रा. सुहास वाघमोडे यांनी भेट दिली. वैयक्तिक, कौटुंबिक, सामाजिक भावनांसह राष्ट्रीय राजकारणावर भाष्य करणाऱ्या कविता लक्षवेधी ठरल्या.
या काव्यवाचन स्पर्धेचे परीक्षण प्रा. प्राजक्ता चितळे व प्रा. स्नेहल कुलकर्णी यांनी केले. या सर्व कार्यक्रमाचे नियोजन प्रा. राजरत्न दवणे यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांनी केले असून, प्रा. विनायक बांद्रे, प्रा. विठ्ठल कोकणी, प्रा. तृप्ती यादव यांनी आयोजनात महत्त्वाची भूमिका बजावली. विद्यार्थी मनीष पवार, यश घडशी, शुभम घडशी, सलोनी घडशी, प्रतीक शिगवण या विद्यार्थ्यांनी सहकार्य केले असून, कार्यक्रमाचे सूत्रसंचालन भक्ती महाडिक व प्रा. ब्रह्मे यांनी केले.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:05 AM 28/Feb/2025














