रत्नागिरी : रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात कृषी विभागाने काजू लागवडीसाठी धडक कार्यक्रम तातडीने हाती घ्यावा. पुढील दोन वर्षात सध्याच्या लागवडीपेक्षा चारपट लागवड होईल, असे उद्दिष्ट ठेवले पाहिजे तसेच कोचीन येथे असलेल्या काजू व कोको संचालनालयाचे विभागीय कार्यालय रत्नागिरी, सिंधुदुर्गात असावे, ही मागणी राज्य शासनाकडे करण्याची सूचना दापोली येथे झालेल्या बैठकीत करण्यात आली.
कार्डियन करेक्ट इंटरनॅशनल फाउंडेशनने (सीसीआयएफ) या संस्थेच्या पुढाकाराने काजू उत्पादक प्रक्रियादारांच्या समस्या समजावून घेऊन अभ्यासपूर्ण अहवाल शासनाला सादर करण्यासाठी दापोली येथे झालेल्या मंथन बैठकीत कोकणातील काजू उत्पादकांची सद्यःस्थिती आणि दीर्घकालीन उपाययोजना यावर चर्चा झाली. या वेळी डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. संजय भावे, संशोधन संचालक डॉ. पराग हळदणकर, ज्येष्ठ शास्त्रज्ञ प्रदीप हळदवणेकर, काजूप्रक्रिया आणि मूल्यसाखळी ज्येष्ठ सल्लागार विवेक अत्रे, काजूप्रक्रिया क्लस्टर उद्योजक जयवंत उर्फ दादा विचारे, काजू फेडरेशनचे धनंजय यादव यांनी मार्गदर्शन केले.
या बैठकीत कार्डियन करेक्ट संस्थेचे रवींद्र अमृतकर आणि सहकार भारतीचे शैलेश दरगुडे सहभागी झाले होते. रत्नागिरी, सिंधुदुर्ग, रायगड, कोल्हापूर व पालघर या जिल्ह्यांमध्ये काजूचे पीक प्रामुख्याने घेतले जाते.
कोकणात रोजगार वाढ होण्यासाठी बंद असलेल्या छोट्या मोठ्या क्षमतेचे काजूप्रक्रिया युनिट्स पूर्णक्षमतेने सुरू होणे आवश्यक आहेत. काजूप्रक्रिया करणाऱ्या लघुउद्योजकांच्या अडचणी दूर करण्यासाठी मुख्यमंत्र्यांसमवेत धोरण निश्चितीसाठी बैठक घ्यावी.
सहकारी शेतकरी उत्पादक संस्था आणि विविध कार्यकारी सोसायट्यांना बळकटी देऊन त्यांच्या समस्यांवर तोडगा काढता येईल, असे मत शैलेश दरगुडे यांनी मांडले. काजू उत्पादकांशी दैनंदिन संपर्कात असलेले अतुल काळसेकर, केदार साठे यांनी या समस्यांचा शासनदरबारी पाठपुरावा करावा, असे सर्वानुमते ठरले.
कोकणातील शेतकऱ्यांच्या समस्या सोडवण्यासाठी राज्यशासनाने विदर्भ मराठवाड्याला दिलेल्या पोकरा, राज्यात सर्वत्र सुरू असलेल्या स्मार्ट, मॅग्नेट योजनेच्या धर्तीवर कोंकणातील शेतीक्षेत्राच्या विकासासाठी मूलभूत सुविधा विकसित होण्यासाठी योजना जाहीर करावी. काजूबोंडाचा फारसा उपयोग केला जात नाही. या बॉडापासून सरबत, सिरप तसेच वाईन तयार करण्याचे तंत्रज्ञान विद्यापिठाने विकसित केले आहे.
लागवडीसाठी विद्यापिठाचे तंत्र वापरा
कोकण कृषी विद्यापिठाने कृषी हवामान विभागनिहाय काजूपिकासाठी अभ्यास केला आहे. त्यातील निरीक्षणानुसार काजूची कोकणातील पारंपरिक लागवड प्रामुख्याने बांधावर तसेच ओसाड जमिनीवर बी लावून केली जात असे.
जुनी लागवड ही बियांपासून तयार केलेल्या रोपांची आहे. १९९० नंतर रोजगार हमी योजनेंतर्गत फळबाग लागवड या योजनेखाली जातीवंत काजू कलमांची मोठ्या प्रमाणावर रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यांमध्ये लागवड झाली. बहुतांश लागवड वेंगुर्ला-४, वेंगुर्ला-७, वेंगुर्ला-८ या सुधारित जातींच्या कलमांपासून केलेली आहे. यापैकी जास्तीत जास्त वेंगुर्ला-४ या जातीची लागवड आहे. विद्यापिठात काजू लागवड व उत्पादनाबाबत अनेक महत्वपूर्ण शिफारशी केल्या असून त्याचा वापर करा असे विद्यापीठाकडून सुचवण्यात आले.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:55 AM 28/Feb/2025














