रत्नागिरी: मे महिन्याच्या सुरुवातीलाच रत्नागिरी जिल्ह्याला अवकाळी पाऊस आणि अचानक आलेल्या भीषण धुळीच्या वादळाचा मोठा तडाखा बसला आहे. दि. १ ते ११ मे या कालावधीत झालेल्या या नैसर्गिक आपत्तीत जिल्ह्यात एकूण २ कोटी ४६ लाख ८५ हजार रुपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज जिल्हा प्रशासनाने व्यक्त केला आहे. विशेषतः शनिवारी आलेल्या धुळीच्या वादळाने जिल्ह्याची दाणादाण उडवली असून, रत्नागिरीच्या इतिहासात पहिल्यांदाच अशा प्रकारचे वादळ पाहिल्याचे ज्येष्ठांकडून सांगण्यात येत आहे.
मंडणगड तालुक्याला सर्वाधिक झळ
या अवकाळी संकटामुळे मंडणगड तालुक्यात सर्वाधिक म्हणजेच एक कोटी रुपयांहून अधिक नुकसान झाले आहे. शनिवारी दुपारनंतर अचानक आलेल्या धुळीच्या वादळामुळे अनेक ठिकाणी मोठी झाडे उन्मळून पडली, घरांवरील पत्रे आणि कौले उडाली, ज्यामुळे या भागात पडझडीच्या घटना मोठ्या प्रमाणावर घडल्या आहेत.
महावितरणचे कंबरडे मोडले; १.१५ कोटींची हानी
वादळी वाऱ्यामुळे झाडे विद्युत तारांवर आणि पोलवर कोसळल्याने महावितरणचे अतोनात नुकसान झाले आहे. प्राथमिक अहवालानुसार, महावितरणचे एकूण १ कोटी १५ लाख रुपयांचे नुकसान झाले असून यात खालील बाबींचा समावेश आहे:
- उच्च दाब पोल: १६४ पोलचे नुकसान.
- लघुदाब पोल: ३२१ पोल मोडले आहेत.
- रोहित्रे (DP): ९ रोहित्रे निकामी झाली आहेत.
नुकसान मोठे असूनही महावितरणच्या कर्मचाऱ्यांनी युद्धपातळीवर काम करून जिल्ह्यातील वीजपुरवठा पुन्हा सुरळीत केला आहे.
नुकसानीचा सविस्तर तपशील (१ ते ११ मे)
जिल्हा प्रशासनाने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार विविध क्षेत्रातील नुकसान खालीलप्रमाणे आहे:
- घरे: एकूण ९०० अंशत: पक्की घरांचे ६१.१० लाख रुपयांचे, तर ५९ कच्च्या घरांचे २.३६ लाख रुपयांचे नुकसान झाले आहे.
- सार्वजनिक मालमत्ता: ८ शाळा (३.२१ लाख), ७ अंगणवाड्या (७१ हजार) आणि ७ इतर इमारतींचे (५९ हजार) नुकसान झाले आहे.
- पशुधन आणि इतर: ४ जनावरे दगावली असून (१.५१ लाख), ४ दुकानांचे (२ लाख) आणि एका पाणीपुरवठा योजनेचे (२५ हजार) नुकसान झाले आहे.
- मानवी इजा: या आपत्तीत २ व्यक्ती जखमी झाल्याची नोंद आहे.
उकाड्याने नागरिक त्रस्त
हवामान खात्याने ७ मे पासून पावसाचा अंदाज वर्तवला होता, त्याप्रमाणे काही ठिकाणी मेघगर्जनेसह सरी कोसळल्या. मात्र, या पावसाने दिलासा देण्याऐवजी उकाड्यात प्रचंड वाढ केली आहे. आर्द्रता वाढल्याने नागरिकांना घामाच्या धारा आणि असह्य उष्णतेचा सामना करावा लागत आहे.
अचानक आलेल्या या नैसर्गिक संकटामुळे रत्नागिरीतील जनजीवन विस्कळीत झाले असून, बाधित नागरिकांना तातडीने मदत मिळण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
17:40 12-05-2026














