संगमेश्वर : उन्हाची काहिली वाढत असल्यामुळे ग्राहकांकडून मातीचे माठ (मडके) खरेदी सुरू झाली आहे. ग्रामीण भागात या माठाला गावठी फ्रीज म्हणूनही ओळखले जाते. नैसर्गिकरीत्या पाणी थंड राहत असल्यामुळे ग्राहक माठ खरेदी करत आहेत.
फेब्रुवारी महिन्याच्या तिसऱ्या आठवड्यात उन्हाचा कडाका वाढल्यामुळे बाजारपेठेत थंड पेयांना मागणी वाढलेली आहे. वाढत्या उन्हापासून बचाव करण्यासाठी पेहरावात बदल केला गेला आहे. सुती, पातळ कपडे वापरण्यावर नागरिकांचा अधिक भर आहे तसेच उन्हामुळे लागणारी तहान शमवण्यासाठी विविध शीतपेयांची व फळांच्या ज्यूससेंटरकडे नागरिकांची पावले वळत आहेत.
महामार्गावरच नव्हे तर शहरांमध्ये ठिकठिकाणी शीतपेय, ऊसाचा रस तसेच फळांची दुकाने मोठ्या प्रमाणात थाटलेली दिसत आहेत. उन्हापासून दिलासा मिळावा यासाठी ग्राहकांची शीतपेयांच्या दुकानांसमोर गर्दी दिसते.
अनेकवेळा ग्राहक ऊसाचा रस किंवा लिंबू सरबत पिताना दिसतात. नैसर्गिकरीत्या पाणी थंड राहत असलेल्या मातीची मडकी विक्रीसाठी आलेली आहेत. दीडशेपासून ते अगदी नक्षीकाम केलेल्या पाचशे रुपयांचे मोठे मडकेही उपलब्ध आहेत. संगमेश्वर एसटी बसस्थानकाबाहेर परजिल्ह्यातून आलेले अनेक विक्रेते मडकी विकताना दिसतात. गेल्या काही दिवसांमध्ये माठाचे दरही उतरलेले आहेत. त्यामुळे ग्राहक मोठ्या प्रमाणात खरेदी करत आहेत.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:15 PM 28/Feb/2025














