खेड : सार्वजनिक बांधकाम विभागाचे स्टोअर रूम चोरट्यांनी फोडले

खेड : शहरातील डाकबंगला येथील सार्वजनिक बांधकाम खात्याचे स्टोअर रूम फोडून अज्ञात चोरट्याने ६८ हजार रुपयांचा ऐवज लांबविल्याचे शुक्रवारी (२८ फेब्रुवारी) सकाळी उघडकीस आले. सायंकाळी उशिरा येथील पोलिस ठाण्यात रितसर तक्रार दाखल होताच श्वानपथकास पाचारण करण्यात आले होते. पोलिस निरीक्षक नितीन भोयर यांनीही घटनास्थळाची पाहणी केली.

येथील सार्वजनिक बांधकाम खात्याच्या विश्रामगृह इमारत उभारणीचे काम सुरू आहे. या इमारत उभारणीच्या कामामुळे जुन्या विश्रामगृहाची इमारत जमीनदोस्त करण्यात आली होती. या विश्रामगृहातील तीन हजारांचे पाच फॅन, १३ हजारांची भांडी आणि पातेली, २४ बेडशिट, दोन सोलापूर चादर असे ६८ हजारांचे साहित्य चोरट्यांनी चोरून नेले.

शुक्रवारी सकाळच्या सुमारास स्टोअर रूम फोडल्याचे कर्मचाऱ्यांच्या निदर्शनास येताच ही बाब येथील सार्वजनिक बांधकाम खात्याच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना कळविण्यात आली. त्यानंतर येथील पोलिस ठाण्यामध्ये तक्रार नोंदवण्यात आली. पोलिस निरीक्षक नितीन भोयर यांनी श्वानपथकास पाचारण करण्याच्या सूचना केल्या. त्यानुसार सायंकाळी उशिरा श्वानपथकही घटनास्थळी दाखल झाले. स्टोअर रूम फोडणारा स्थानिक असण्याच्या शक्यतेने पोलिसांनी तपासाला गती दिली आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:38 AM 03/Mar/2025

Vinayka motars