चिपळूण : गेल्या २० वर्षात नगरपालिका प्रशासनाला नव्याने उभारलेली भाजीमंडई आणि मटणमार्केट शहरातील छोटे-मोठे विक्रेते व व्यापाऱ्यांकरिता खुली करता आलेली नाही. प्रशासनाच्या निष्क्रियतेमुळे स्थानिक विक्रेता ग्राहकांना अक्षरशः नगर पालिकेच्या सुविधांपासून वंचित राहावे लागले आहे; मात्र आता प्रशासन आपल्या अपयशाचे खापर फोडण्यासाठी छोटे छोटे विक्रेते आणि फेरीवाल्यांवर ऐन रमजान व शिमगोत्सवाच्या तोंडावर अतिक्रमणच्या नावाखाली बिनबोभाट कारवाईन अन्याय करत असल्याचा गंभीर आरोप माजी उपनगराध्यक्ष सुधीर शिंदे यांनी केला.
सलग दोन दिवस शहरात नगरपालिकेकडून अतिक्रमण हटाव मोहीम सुरू आहे. बाजारपेठेतील पानगल्ली, नाईक कंपनी पूल, भाजीमंडई, चिंचनाका, भोगाळे, पॉवरहाऊस, उपनगर परिसरातील हातगाडीधारक, खोकेधारक व फेरीवाल्यांवर कारवाई केली. एवढेच नव्हे तर आता रस्त्यालगत व्यवसाय करणाऱ्या विक्रेत्यांवर थेट गुन्हा दाखल करण्यात येणार असल्याचे नगर पालिका प्रशासनाने बजावले आहे; मात्र काही व्यावसायिकांना वगळून कारवाईत दुजाभाव केला जात असल्याची ओरड सुरू आहे.
या पार्श्वभूमीवर स्थानिक विक्रेत्यांमधून तीव्र भावना व्यक्त केल्या जात असून, माजी उपनगराध्यक्ष शिंदे यांनीही प्रशासनाच्या या दुटप्पी भूमिकेचा समाचार घेतला आहे. या विषयी शिंदे यांनी सांगितले. मुळात शहरात गोरगरीब व छोट्या-मोठ्या विक्रेत्यांना रस्त्यावर बसण्याची वेळ नगरपालिका प्रशासनानेच आणली आहे.
नगरपालिकेने एखादा प्रकल्प हाती घेतल्यानंतर तो दोन ते तीन वर्षात पूर्ण झाला पाहिजे; मात्र २०-२० वर्षे होऊनही प्रकल्प मार्गी लागत नाही किंवा तो जनता व व्यावसायिकांसाठी खुला होत नसेल, तर ती प्रशासनाचीच जवाबदारी आहे.
आधीच्या महर्षी कर्वे भाजीमंडईत भाजीव्यापारी गुण्यागोविंदाने नांदत होते. सर्व भाजीव्यापार एका छताखाली चालत होता. तेव्हा रस्त्यावर भाजीविक्री होत नव्हती; परंतु प्रकल्प लांबल्याने विक्रेत्यांना रस्त्यावर बसावे लागते. शहरातील विक्रेत्यांना याचा फटका बसत आहे. प्रशासनाला दिसत नाही का, असा सवाल शिंदे यांनी केला.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:47 AM 03/Mar/2025














