साडवली : देवरूख शहरातील चोरपऱ्या स्वच्छ करण्याचे अभियान आठ मंडळांनी एकत्र येऊन यशस्वी केले. यामध्ये सुमारे ६० हून अधिक स्वच्छतादूत हातामध्ये खराटा घेऊन सहभागी झाले होते. चोरपऱ्यात साठलेला प्लास्टिक कचरा स्वच्छ करण्यात आला. त्यामुळे या चोरपऱ्याने बऱ्याच दिवसांनी मोकळा श्वास घेतला.
देवरूख शहरातील वसुंधरा वसाहतीच्या प्रवेशद्वाराजवळील पुलापासून (विसर्जन घाट) स्वच्छतामोहिमेला सुरुवात झाली. शांताराम कांगणे यांच्या हस्ते याचा प्रारंभ झाला, या अभियानात ज्येष्ठांसह सर्व स्तरातील नागरिक सामील झाले होते. रविवारी सकाळी ७ ते ९.३० या वेळेत हे अभियान राबवण्यात आले. पूर्वेकडून पश्चिम दिशेने वाहत जाणारा देवरूखच्या सीमेलगत सप्तलिंगी नदीला जाऊन मिळणारा हा एक प्रमुख पऱ्या आहे. उन्हाळ्यात कोरडा असला तरीही पावसाळ्यात हा भरून वाहतो. हा चोरपऱ्या म्हणजे कचराकुंडी किंवा गटार बनलेले आहे. स्वच्छता करताना त्यामध्ये प्रचंड प्रमाणात प्लास्टिक, डायपर, हगीज, कपडे आदी टाकाऊ वस्तू होत्या तसेच त्यामध्ये बरेचसे गणपती विसर्जन घाट समाविष्ट आहेत म्हणूनच सर्व मंडळांच्या प्रमुखांनी स्वच्छता अभियान राबवण्याचा निर्णय घेतला होता.
गणपती विसर्जनसारख्या पवित्र घाटाजवळच कचऱ्याचा ढीग, प्लास्टिक व घाण पाहायला मिळाली. या अभियानानिमित्त देवरूखमधील सर्व मंडळे, सामाजिक संस्था, क्रीडा मंडळे एकत्र आली होती. यापुढे चोरपऱ्यामध्ये कुणीही घरगुती सांडपाणी सोडू नये, कचरा टाकू नये किंवा निर्माल्य विसर्जित करू नये, असे आवाहन करण्यात आले आहे. कोणीही तिथे कचरा टाकला तर दंडात्मक कारवाई करावी, अशी मागणी मंडळातील प्रमुखांनी केली आहे. त्याचबरोबर देवरूख नगरपंचायतीनेही आवश्यक तिथे कचराकुंड्यांची व्यवस्था करावी, असे आवाहन केले आहे. अभियानासाठी नगरपंचायतीचे मुख्याधिकारी विसपुते यांनी हँडग्लोव्हज् उपलब्ध करून दिले. आता अभियानाचा पुढील टप्पा कांगणेवाडी विसर्जन घाट ते चोरपऱ्या पूल असा असेल.
या संस्थांचा मोहिमेत सहभाग
देवरूखमध्ये राबवलेल्या स्वच्छता अभियानात स्वस्तिक युवा प्रतिष्ठान, देवरूख, शैलेश क्रीडा मंडळ, कांगणेवाडी, अमृतनगर मित्रमंडळ, सन्मित्र नगर रहिवासी, जय हनुमान, कांगणेवाडी, जय हनुमान देवरूख, विजय प्रतिष्ठान, मार्लेश्वर मित्रमंडळ उत्स्फूर्त सहभागी झाले होते. समाजातील विविध मंडळे आणि संस्थांनी एकत्र येऊन स्वच्छतामोहीम राबवण्याची ही प्रेरणादायी सुरुवात आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
02:56 PM 04/Mar/2025














