रत्नागिरी : महिलांच्या हाती कांदळवन सफरीची दोरी..

रत्नागिरी : संथ पाणी कापत जाणारी बोट, क्षितिजावर दिसणारा उगवता सूर्य आणि त्याचे पाण्यात पडलेले प्रतिबिंव, नदीकाठावर असलेले कांदळवन आणि त्यावर मुक्तसंचार करणारे पक्षी ही दृश्य आहे, पावस येथील गौतमी नदीच्या काठावरील. या गौतमी नदीत कांदळवन प्रतिष्ठानच्या सहकार्याने कांदळवन पर्यटन प्रकल्प राबविला जात आहे. या प्रकल्पाचे वैशिष्ट्य म्हणजे महिलाच पर्यटकांना कांदळवन सफारी घडवून आणतात. पक्षी निरीक्षण, कांदळवन अभ्यास आणि कांदळवनाची सफर वा महिला घडवित आहेत. याला पर्यटकांचाही चांगला प्रतिसाद मिळत आहे.

कोकण किनारपट्टीलगत मोठ्या प्रमाणात कांदळवन आहे. या कांदळवनाचे संरक्षण आणि संवर्धन व्हावे यासाठी प्रयत्न केले जात आहेत. कांदळवन पर्यटनाला गती देण्यासाठी कांदळवन पर्यटन गाव हा उपक्रम राबविण्यात येत आहे. या अंतर्गत रत्नागिरी जिल्ह्यातील पावस गावात कांदळवन पर्यटन सुरु करण्यात आले आहे.

कांदळवन कक्ष, वन विभाग महाराष्ट्र राज्य व कांदळवन प्रतिष्ठान यांच्या सहाय्याने कांदळवन संरक्षण व उपजीविका निर्माण योजनेअंतर्गत किनारी गावांमध्ये कांदळवन सहव्यवस्थापन समित्यांची स्थापना करण्यात आली आहे. पावस गावातून वाहणारी गौतमी नदी ही रनपार खाडीला जावून मिळते.

याठिकाणी मोठ्या प्रमाणात कांदळवन क्षेत्र असून, पांढरी चिपी, कांदळ तिवारी, काटेरी हुरी, किरकिरी, सुंगधासह नऊ प्रकारच्या कांदळवन प्रजाती आढळतात, तसेच याठिकाणी २० हुन अधिक पक्षी तर कोल्हा, घोरपड यासारखे प्रणी येथे येणाऱ्या पर्यटकांना पहायला मिळतात. खाडीमध्ये खेकडे, मासे विविध प्रकारचे प्राणी आढळून येतात.

पावस येथे सुरु करण्यात आलेल्या कांदळवन पर्यटन प्रकल्पांतर्गत १० महिला काम करीत आहेत. या महिला खारवी समाजाच्या आहेत. या समाजातील महिलांचा नदी, पाण्याशी जवळचा संबंध असतो. बोट चालविणे हा त्यांचा जन्मजात गुणच आहे. पर्यटन प्रकल्पामुळेवा गटातील महिलांमा आत्मविश्वास वाढला असून, महिला कोणत्याही क्षेत्रात कमी नाही, हे त्यांनी दाखवून दिले आहे.

प्रकल्पांतर्गत १० महिला काम करीत असून, वाच्या अध्यक्ष सुरेखा पावसकर तर श्रुती पावसकर या सचिव म्हणून काम करतात. शोभा पावसकर, प्रविणा पावसकर, श्रेया पावसकर, किरण सारंग, मानवी डोर्लेकर, जागृती पावसकर, किमया पावसकर, प्रफुल्ल पावसकर या महिलांचा समावेश आहे. निखिल पावसकर, दिवाकर वडपकर हे जीवसंरक्षक म्हणून काम करतात. या प्रकल्पांतर्गत महिलांच बोट वल्हविण्याचे काम करतात. यासाठी आवश्यक ते सर्व प्रशिक्षण त्यांना देण्यात आले आहे.

नदीतील गाळ ठरतोय पर्यटनाला अडसर
गौतमी नदीतील गाळ खूप वर्ष न काढल्याने पर्यटकांना कांदळवन सफर घडविताना अडचण होत आहे. गाळ उपसल्यास बोट चालविताना सोयीचे होईल, यासाठी प्रशासनाने या खाडीतील गाळ उपसा करावा, अशी मागणी या गटातील महिलांनी केली आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:39 AM 08/Mar/2025