पालीतील श्री लक्ष्मीपल्लीनाथचा आजपासून शिमगोत्सव

रत्नागिरी : पालीचे ग्रामदैवत श्री लक्ष्मीपल्लीनाथ देवस्थानचा वार्षिक शिमगोत्सव आज सोमवारपासून (ता.१०) सुरू होत आहे. यात पालखी सजवणे, देवाला रूपे लावणे, होळी आणणे, पौर्णिमेचा होम, नवस बोलणे-फेडणे, नमन यांसारखे धार्मिक कार्यक्रम होणार आहेत.

सोमवारी दुपारी २ ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत पालखी सजवणे, रूपे लावणे, रात्री साडे अकरा वाजेपर्यंत पालखीचे दर्शन, त्यानंतर श्रींची पालखी मंदिराबाहेर प्रांगणात खेळवण्यात येईल. ११ मार्च रोजी दुपारी २ वा. सहाणेवरून श्री देव व गावकरी नियोजित ठिकाणी होळी आणण्यासाठी जातील. होळी आणून उभी करून पूजा, रात्री साडे नऊ वाजता होळीजवळ नवस बोलणे, फेडणे, रात्री साडे दहा वाजता पालीचे नमन रंगणार आहे. १३ मार्च रोजी दुपारी २ वाजता सहाणेवरून श्रीदेव व गावकरी पाथरट, कापडगाव, चरवेली यापैकी नेमलेल्या ठिकाणाहून श्रींची कोकड होळी आणण्यासाठी जातील. सायंकाळी ६ वाजता कोकड होळी घेऊन येतील. रात्री ९ ते १० वाजता कोकड होळी गुलालाची उधळण करीत नाचवत, खेळवत आणतील. रात्री १० वाजता पौर्णिमेचा होम होईल व होळीच्या शेंड्याजवळ नवस बोलणे व फेडणे कार्यक्रम होईल. रात्री साडे दहा वाजता पाथरटचे नमन होईल.

१४ मार्च रोजी धुळवडीसाठी ढोल व निशाण जाईल. १९ मार्च रोजी रंगपंचमी दिवशी सहाणेवर बैठकीत शिंपण्यांचा कार्यक्रम होईल व देवाच्या ग्रामफेरीचे नियोजन होईल. त्यानंतर श्री लक्ष्मीपल्लीनाथांचे ज्या ठिकाणी प्रथम आगमन झाले त्या देवाचा आंबा (देवतळे) येथे जाईल. देवाची पालखी गावाची पूजा स्वीकारील. गादीवरची पूजा स्वीकारेल. २० मार्चपासून मानाप्रमाणे मानकरी व गावकरी यांच्या घरोघरी जाउन पालखी पूजा स्वीकारेल. ३१ मार्च गुढीपाडव्यादिवशी सायंकाळी पालखीची ग्रामफेरी पूर्ण होऊन गादीवर मुख्य मानकरी व देवस्थानचे अध्यक्ष संतोष सावंतदेसाई (खोत) यांच्या घरी पालखी वस्तीला राहील. त्या वेळी गादीवरची पूजा, सवाशेराचा महानेवैद्य, महाप्रसाद होईल. रात्री देवासाठी श्रमपरिहार म्हणून पालीच्या गावकरी यांचे नमन होईल. १ एप्रिल रोजी गादीवरची गावाची बैठक होऊन तेथून ढोलताशांच्या गजरात पालखी मंदिराच्या प्रांगणात प्रवेश करेल त्यानंतर गावाचे गाऱ्हाणं होऊन घाट धुपारतीने पूजा होऊन मंदिरात स्थानापन्न होतील.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:15 10-03-2025