राजापुरात बचतगटाच्या महिलांची भव्य रॅली

राजापूर : गेल्या कित्येक महिन्यांपासून शासनदरबारी प्रलंबित असलेल्या उमेद विभागाच्या विविध मागण्यांसाठी तालुक्यातील उमेद विभागांतर्गत कार्यरत अधिकारी, असलेल्या कर्मचारी यांच्यासह सीआरपी, बचतगटाच्या महिलांनी भव्य रॅली काढली. तहसील कार्यालय ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर भवन अशी रॅली काढण्यात आली.

या रॅलीमध्ये हजारोंच्या संख्येने सहभागी झालेल्या महिलांनी महाराष्ट्र ग्रामीण जीवनोन्नत्ती अभियान विभागाला नियमित आस्थापना म्हणून मान्यता मिळालीच पाहिजे, उमेद विभागाच्या मागण्या मान्य झाल्याच पाहिजे, अशी जोरदार घोषणाबाजी केली. सगळीकडे नवरात्रोत्सवाची धामधूम सुरू असताना उमेद विभागाच्या महिलांनी रॅलीद्वारे अंगीकारलेल्या दुर्गावताराने साऱ्यांचे लक्ष वेधून घेतले होते. उमेद महाराष्ट्र राज्य महिला कर्मचारी संघटनेच्या वतीने विविध मागण्यांचे निवेदन तहसीलदारांना देण्यात आले. महाराष्ट्र ग्रामीण जीवनोनत्ती अभियानांतर्गत कार्यरत उमेद विभागाच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात महिला बचतगटाचे जाळे विणले गेले आहे बचतगटाच्या माध्यमातून एकत्रित आलेल्या महिलांकडून विविध स्वरूपाचे उद्योग-व्यवसाय वा गृहोद्योग करत स्वतःसह कुटुंबाच्या अर्थार्जनाला हातभार लावला जात आहे. या विभागाच्या अनेक मागण्या गेल्या काही वर्षांपासून शासनदरबारी प्रलंबित आहेत.

त्यांची पूर्ती करण्यासाठी ठोस कार्यवाही न करता शासनाकडून केवळ आश्वासने दिली जात आहेत. त्यामुळे मागण्यांची पूर्ती होण्यासाठी तालुक्यामध्ये काल रॅली काढून शासनाचे लक्ष वेधण्यात आले. या रॅलीमध्ये उमेद महाराष्ट्र राज्य महिला व कर्मचारी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांसह तालुक्यातील उमेद विभागाचे अधिकारी, सौआरपी, बचतगटांच्या महिला मोठ्या संख्येने सहभागी झाल्या होत्या.

प्रमुख मागण्या
उमेद महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नत्ती अभियानास ग्रामविकास व पंचायतराज विभागामधील शासनाचा एक नियमित विभाग म्हणून आस्थापनेला मान्यता देणे. त्या अंतर्गत कार्यरत कंत्राटी अधिकारी व कर्मचारी शासनाच्या समकक्ष पदांवर कायमस्वरूपी सेवेत समाविष्ट करून घेणे आणि समुदाय संसाधन व्यक्ती यांना (आशासेविका, अंगणवाडी सेविका यांच्याप्रमाणे) शासकीय दर्जा देणे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:59 AM 05/Oct/2024