रत्नागिरी : काँग्रेस प्रदेशाध्यक्षांच्या रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग दौर्याची माहिती देण्यासाठी आलेल्या प्रदेश उपाध्यक्ष गणेश पाटील यांनी ज्येष्ठ नेते रमेश कीर गळ्यात पुन्हा रत्नागिरी जिल्ह्याच्या अध्यक्ष पदाची माळ पडण्याचे संकेत दिले होते. मात्र मी जिल्हाध्यक्ष पदासाठी इच्छुक नाही, असा खुलासा आता खुद्द रमेश कीर यांनी केला आहे.
कुणा नवीन कार्यकर्त्याला आता हि संधी मिळाली पाहिजे, असे मत रमेश कीर यांनी व्यक्त केले आहे. काँग्रेस भवन येथे झालेल्या पक्षीय कार्यक्रमात कीर उपाध्यक्षांच्या उजव्या हाताच्या बाजुला बसले होते. यातून कीर यांनाच जिल्हाध्यक्षपदाची संधी मिळण्याची चर्चा सुरु झाली होती.
विधानसभा निवडणुकीपासून जिल्हाध्यक्ष पद रिक्त आहे. प्रदेश उपाध्यक्ष गणेश पाटील, सरचिटणीस रमेश शेट्टी यांच्या मंगळवारच्या दौर्यावेळी उपस्थित असलेले बहुसंख्य पदाधिकारी कीर गटाचेच दिसून येत होते. यावेळी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते संजय ऊर्फ बाळा मयेकर, दीपक राऊत, अशोक जाधव, अश्पाक कार्दी, रुपाली सावंत, अॅड. अश्विनी आगाशे आदी मान्यवर उपस्थित होते.
विधानसभा निवडणुकीवेळी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अविनाश लाड यांनी राजापूर मतदारसंघातून बंडखोरी करत उमेदवारी अर्ज भरला होता. त्यामुळे त्यांना काँग्रेस पक्षातूनच बाजूला करण्यात आले. तेव्हापासून जिल्हाध्यक्ष पद रिक्त आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:51 13-03-2025
