साडवली : गेली अनेक वर्षे देवरूख येथील बचत भवन फक्त शारकीय कामासाठी वापरले जाते. ते जनतेसाठी उपलब्ध करून दिले जात नाही. तरी ते जनतेसाठी लवकरात लवकर उपलब्ध करून द्यावे, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते युयुत्सु आर्ते यांनी संगमेश्वर तहसीलदारांकडे निवेदनाद्वारे केली आहे.
बचत भवन बांधल्यानंतर अनेक वर्षे जनतेच्या विविध कामांसाठी ते जनतेला उपलब्ध करून दिले जात होते. मात्र नवीन तहसीलदार कार्यालयाच्या बांधकामाच्या वेळी तात्पुरत्या स्वरुपात हे बचत भवन शासकीय कामासाठी वापरले जाऊ लागले व नवीन तहसीलदार कार्यालयाचे बांधकाम झाल्यानंतरही गेली १५ वर्षे हे बचत भवन जनतेसाठी उपलब्ध करण्यात आलेले नाही.
आमसभेतही हे बचत भवन जनतेसाठी उपलब्ध करून देण्याबाबत ठराव करण्यात आला आहे. तसेच ना. योगेश कदम हे देवरुख येथे भेटीसाठी आले असताना त्यांनाही याबाबत तोंडी कल्पना दिली असल्याचे आर्ते यांनी निवेदनात नमूद केले आहे. तरी देवरुख येथील बचत भवन तातडीने जनतेला उपलब्ध करून देणेबाबत सकारात्मक निर्णय घ्यावा, यासाठी संघर्ष करावा लागणार नाही याची खात्री आहेच, असेही आर्ते यांनी शेवटी निवेदनात नमूद केले आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:45 AM 13/Mar/2025














