चिपळूणचे तापमान ४१ अंश सेल्सिअस

चिपळूण : कोकणात शिमगोत्सवाला सुरुवात झाली असताना तापमानाने चाळिशी पार केली आहे. गुरुवारी चिपळूण भागातील तापमान ३८ ते ४१ अंशांपर्यंत नोंदले गेले. वाढत्या उन्हामुळे नागरिकांचीही लाहीलाही झाल्याचे दिसून आले शिवाय विजेची मागणीही वेगाने वाढू लागली आहे. हा दाह पुढील तीन महिने नागरिकांना सहन करावा लागणार आहे.

सध्या फाल्गुन मास सुरू असून, वैशाख वणव्यासारखे उन्हाचे चटके बसू लागल्याने यंदाचा उन्हाळा कडक असणार याची खात्री नागरिकांना झाली आहे. गेल्या दोन, चार दिवसांपासून तालुक्याचे तापमान दिवसागणिक वाढू लागलेले आहे. गुरुवारी सर्वच भागांत तापमान ३८ ते ४१ अंश सेल्सिअस असे नोंदले गेले, यामुळे नागरिक उष्णतेमुळे कमालीचे हैराण होऊ लागले आहेत.

सकाळी नऊपासूनच शहर आणि तालुक्यात उन्हाची दाहकता जाणवते, दुपारच्या सत्रात हा चटका आणखी वाढतो. त्यामुळे दुपारच्यावेळी अनेक शहरांत, गावातील रस्त्यावर शुकशुकाट असतो. वाढत्या उन्हामुळे घशाला कोरड पडण्याचे प्रमाणही वाढू लागल्याने नागरिक तहान भागवण्यासाठी शीतपेयांकडे वळू लागले आहेत. यामुळे जागोजागी थंडगार शीतपेयांच्या गाड्या दिसू लागल्या आहेत. बरेच नागरिक उसाच्या थंडगार रसाला पसंती देत आहेत, शिवाय कलिंगडांनाही मागणी वाढत आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
09:50 AM 15/Mar/2025