दापोलीत जलवाहिनीमधून लाखो लिटर पाणी वाया

दापोली : दापोली शहरातील काळकाईकोंड व उसी पार्क येथे जलवाहिनीमधून लाखो लिटर पाणी वाया जात असल्यामुळे नागरिकांमधून तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे.

दापोली शहराला कोडजाई व नारगोली येथे असलेल्या नळपाणी योजनेतून आवश्यकतेनुसार पाणीपुरवठा केला जातो. एप्रिलच्या मध्यावर कोडजाईतील पाणीपुरवठा ठप्प होतो. त्यानंतर नारगोली येथील योजनेवर दापोलीकरांना भरवसा ठेवावा लागतो. दापोलीकरांना दिवसाला २० लाख लिटर पाण्याची गरज आहे. सध्या दापोलीमध्ये २ दिवसाआड पाणीपुरवठा केला जात असून, एप्रिलच्या १५ तारखेनंतर त्यामध्ये आणखीन वाढ होण्याची शक्यता आहे.

तर मे महिन्यात पाण्याच्या साठ्याचा अंदाज घेऊन पाणीपुरवठा करावा लागतो. दापोलीपासून सुमारे १५ किमी अंतरावर असलेल्या सोंडेघर येथील धरणातून ९९ कोटी रुपये खर्च करून नवीन नळपाणी योजना आणण्याचे गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी नियोजन केले असून, काही दिवसांपूर्वी दापोलीत झालेल्या कार्यक्रमात ही नळपाणी योजना पूर्ण करण्याचे आश्वासन दिले आहे. यासाठी दापोली नगरपंचायतीमधून पाणी तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठवण्यात आले आहे. सुमारे १५ दिवसांत या कामाचे भूमिपूजन होण्याची शक्यता असून, दापोलीकरांना पुढील वर्षभरात सोंडेघर येथून पाणीपुरवठा केला जाण्याची शक्यता आहे.

टंचाई असताना काळकाईकोंड येथील पाण्याच्या टाकीबाहेरील मुख्य मार्गानजीक पाईपलाईनमधून दिवसाला लाखो लिटर पाणी वाया जात असून, उसी पार्क येथेही अशीच परिस्थिती आहे. त्यामुळे पाण्याचे नियोजन करताना नगरपंचायत प्रशासनाने पाणी वाया जाऊ नये यासाठी तत्पर राहण्याची गरज असल्याचे नागरिकांचे मत आहे.

बाराही महिने एक दिवसआड करून पाणी येत आहे. पाणीपट्टी मात्र तेवढीच घेतली जाते तसेच थोड्याच दिवसात भीषण पाणीटंचाईला सामोरे जावे लागणार आहे. अशातच नगरपंचायतीच्या या अशा भोंगळ कारभारामुळे हे एवढं लाखो लिटर पाणी वाया जात आहे. नगरपंचायतीने वेळीच लक्ष देऊन ही गळती बंद करणे नितांत गरजेचे आहे- सलीम रखांगे, ग्रामस्थ, काळकाई

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:00 AM 15/Mar/2025