गुहागर : पोचरीआगर येथे शिव्यामुक्त गावाचा संकल्प

साखरपा : साडवली येथील चक्रभेदी सोशल फाउंडेशनच्या वतीने गुहागर तालुक्यातील पोचरीआगर येथे महिला दिन साजरा करण्यात आला. या निमित्ताने पोचरीआगर हे गाव शिव्यामुक्त करण्याचा संकल्प करण्यात आला.

पोचरीआगर येथील प्राथमिक शाळेत महिला दिन साजरा करण्यात आला. या निमित्ताने एका विशेष कार्यक्रमात समाजसुधारक नंदकुमार मोहिते यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. प्रमुख मार्गदर्शिका वैदेही सावंत यांनी तरुण पिढीचे शहरांकडे होत असलेल्या स्थलांतराकडे लक्ष वेधले. हे स्थलांतर थांबवण्याची गरज त्यांनी व्यक्त केली. त्याचप्रमाणे महिलांविषयी असलेल्या अनिष्ट प्रथांवर त्यांनी भाष्य करत चिंता व्यक्त केली. गावाच्या सामाजिक आणि सांस्कृतिक जडणघडणीसाठी शिव्यामुक्त गावाची गरज सावंत यांनी बोलून दाखवली. गुंड आणि समाजविघातक प्रवृत्तीचा पाया हा शिव्या देण्यातून सुरू होत असल्याचे त्या म्हणाल्या. त्यामुळे शिव्यामुक्त गाव विकासास पोषक असल्याचे मत त्यांनी मांडले. त्यानंतर उपस्थित सर्वांनी शिव्यामुक्त गावासाठी प्रयत्नशील राहण्याचा संकल्प केला. तसेच गावात कोणी शिवी दिली तर त्याला आर्थिक दंड लावण्याचा ठरावही संमत करण्यात आला.

यावेळी तृप्ती हुमणे, सोनाली यादव, दीपश्री हुमणे यांनी मनोगत व्यक्त केले. शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षा साक्षी हुमणे, उपाध्यक्षा सपना हुमणे, ग्रामसेवक व्ही. पी. पावरा, उपशिक्षिका पल्लवी पवार, शिक्षक शिवाजी साळवे, शिक्षणतज्ज्ञ संदीप पाष्टे आदी उपस्थित होते.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:40 AM 15/Mar/2025