रत्नागिरी : ढोलताशांचा गजर, गुलालाची उधळण, जय भैरी लिहिलेले टी-शर्ट घातलेले युवक आणि हजारो भाविकांची तुडुंब गर्दी अशा पारंपरिक उत्साहात सायंकाळी ग्रामदैवत श्री भैरी-जुगाईची सुरमाडाची होळी झाडगाव सहाणेजवळ उभी राहिली. बारा वाड्यांतील ग्रामस्थ, ट्रस्टी, मानकरी, गुरव मंडळींच्या उपस्थितीत हा सोहळा सुमारे दोन तास रंगला. होळी उभी राहिल्यानंतर धुपारत व गाऱ्हाणे घालण्यात आले. पालखीत विराजमान झालेल्या श्री देव भैरीचे दर्शन घेण्यासाठी रीघ लागली.
मध्यरात्री श्रीदेव भैरीची पालखी श्रीदेवी जोगेश्वरी भेटीसाठी, ग्रामप्रदक्षिणा व जोगेश्वरीची होळी उभी करण्यासाठी निघाली. मंदिरात पालखी येऊन त्यानंतर झाडगाव सहाणेवरून झाडगाव नाका, टिळक आळी, काँग्रेस भवन, मुरलीधर मंदिर, बंदररोड, मांडवी भडंग नाका येथे पालखी पोहोचली. त्यानंतर प्रथेप्रमाणे मांडवी, घुडेवठार, विलणकरवाडी, चवंडे वठार, खडपेवठार, गोडीबाव तळे, तेलीआळी, रामनाका येथे आली.
दुपारच्या दरम्यान राधाकृष्णा नाका, गोखलेनाका येथून पालखी श्रीदेव भैरीच्या सहाणेमागे दीपक गंगाराम गावडे यांच्या कंपाऊंडमध्ये होळीचा शेंडा घेण्यासाठी पालखी पोहोचली. येथे होळीला दोरखंड बांधून एक नारळ होळीला व दुसरा त्या ठिकाणच्या मालकाला देऊनही तोडण्यात आली. होळी तोडण्यासाठी व नेण्यासाठी प्रथेप्रमाणे मान असतात. त्यानंतर पालखी व होळी झाडगाव सहाणेवर आणण्यात आली. धुपारत, मानपान झाल्यानंतर एक लहान होम करण्यात आला. त्या भोवती श्री देव भैरी पालखीने प्रदक्षिणा घातल्या व पालखी खेळवत पुन्हा सहाणेवर आली.
लगबग आणि आनंदोत्सव
सायंकाळी सुरमाडाची होळी उभी करण्यासाठी ग्रामस्थांची लगबग सुरू होती. सुरमाडाच्या भल्यामोठ्या होळीला उभे करण्यासाठी मोठे दोरखंड, मजबूत सागवानी वासे यांचा वापर करून सर्व ग्रामस्थांनी एकीने होळी उभी केली. त्यानंतर धुपारत झाली तसेच मानकऱ्यांना विडा-सुपारी देण्यात आली. गुरव यांनी पालखी व होळी यांची पूजा करून नैवेद्य दाखवला. या वेळी अलोट गर्दी पाहायला मिळाली. त्या वेळी भक्तांच्या आनंदाला पारावार उरला नाही.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:57 AM 15/Mar/2025














