राजापूर : पांगरे बुद्रुकमधील पाणीयोजनेचे काम थंडावले

राजापूर : तालुक्यातील जलजीवन मिशन योजनेंतर्गत पांगरे बुद्रुक प्रादेशिक योजनेचे काम संथगतीने सुरू आहे. त्यामुळे ज्या उद्देशाने ही योजना राबवली जात आहे तो उद्देश सफल होताना दिसत नाही. या साऱ्याकडे लक्ष वेधत नळपाणी योजनेचे काम जलदगतीने पूर्ण करण्याबाबत आमदार सदाभाऊ खोत यांनी राज्याच्या सध्या सुरू असलेल्या अधिवेशनामध्ये औचित्याच्या मुद्द्याद्वारे शासनाचे लक्ष वेधले.

तालुक्यातील पांगरे बुद्रुक धरणावर पांगरे बुद्रुक प्रादेशिक नळपाणी योजना राबवण्यात येत आहे. या योजनेवरून परिसरातील कोंड्येतर्फे राजापूर, उन्हाळे, दोनिवडे, शेंबवणे, पांगरे, ससाळे, आंगले, पांगरे, फुपेरे, सोल्ये, हसोळ, जांभवली, पोटलेवाडी, तुळसवडे सोलिवडे, ताम्हाणे पहिलीवाडी व धनगरवाडी आदी गावांना पाणीपुरवठा केला जाणार आहे. या योजनेला मंजूर होऊन जवळपास चार वर्षे झाली असली तरीही या योजनेचे काम अद्यापही पूर्ण झालेले नाही. त्याबाबत संबंधित गावांमधून तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे.

जलजीवन मिशन योजनेंतर्गत राबवण्यात येत असलेल्या पांगरे बुद्रुक प्रादेशिक नळपाणी योजनेचे काम जलदगतीने व्हावे, या उद्देशाने आमदार खोत यांनी औचित्याच्या मुद्द्यांद्वारे शासनाचे लक्ष वेधले.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:14 AM 15/Mar/2025