साडवली : रत्नागिरी जिल्ह्यातील शिमगोत्सवाबद्दल सांगायचे झाले तर अनेक गावांत शिमग्याच्या विविध परंपरा आहेत. पण संगमेश्वर तालुक्यातील कोंढ्रण गावातील शिमगोत्सव हा आगळावेगळा आहे. या गावात पालखी नाही. शिमगोत्सवात ग्रामदेवतांची पालखी सोहळा नसलेले एकमेव गाव आहे.
गणेशभट्ट सप्रे यांना वतन म्हणून दिलेला हा सुभा पाणथळ भाग असलेल्या कोंडात गणेशभट्ट सप्रे यांनी वसवला असल्याने गावचे नाव कोंढूण या गावात घनदाट जंगलात ग्रामदेवी मंदिर आहे. २५ ते ३० वर्षापूर्वी गवा, वाघ बिबट्या, साळींदर, कोल्हा, भेकरू, मोर, गिधाड आदी विविध प्राणी व पक्षी सहज वावरताना दिसायचे. हल्ली ते प्रमाण कमी आहे. गावात सप्रे मंडळींची अनेक घरे होती. सप्रे कुटुंबातील आताची ही आठवी पिढी आहे. सध्या गावात पाच ते सहा घर असून गावात कोणी कायम वास्तव्याला राहत नाहीत.
काही सप्रे कुटुंबीय हे देवरूख व देवधामापूर गावात तर अनेकजण परगाव व राज्यात वास्तव्यास आहेत. तरी गावच्या व देवीच्या कार्यक्रमाला मानकरी म्हणून सप्रे कुटुंबीय गावात येऊन देवीचे कार्य करतात. गावातील पूर्वापार चालत आलेल्या प्रथापरंपरा जोपासताना होळी उत्सवात जाखमाता देवीला रूपे लावून दागदागिन्यांनी सजवले जाते व देवीची विधीवत पूजाअर्चा केली जाते. त्यानंतर होम तयार केला जातो. तो सामायिक असतो. होळी गावातून तोडून गावकरी हातावरून वाजतगाजत नाचवत देवळात आणतात व देवीच्या प्रांगणात उत्साहात नाचवतात. त्यानंतर ती उभी करून तिची विधीवत पूजा केली जाते देवळात देवीला प्रदान केलेले हातभेटीचे नारळ, ओट्या, पूर्ण झालेले नवस मानवले जातात व शिमगोत्सवाची सांगता होते.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:23 AM 15/Mar/2025














