चिपळूण : देव सोमेश्वर व श्री देवी करंजेश्वरी शिमगोत्सव उत्साहात

चिपळूण : सलग चार दिवस भक्ती, उत्साह, आनंद जल्लोषाने साजरा करण्यात आलेला श्री देव सोमेश्वर व श्री देवी करंजेश्वरी देवस्थानच्या शिमगोत्सवाची शुक्रवारी सायंकाळी अभूतपूर्व उत्साहात सांगता झाली. या सांगता समारंभाला एखाद्या यात्रेचे स्वरूप आले होते. दोन्ही पालख्यांचा प्रदक्षिणा सोहळा पाहून अनेक भाविक अक्षरशः भारावून गेले.

चिपळूण शहरातील गोवळकोट पेठमाप येथील ग्रामस्थांचे श्रद्धास्थान असलेल्या श्री देवी करंजेश्वरी व श्री देव सोमेश्वर देवस्थानचा शिमगोत्सव यावर्षी ११ मार्चला सुरू झाला. हिंदू-मुस्लिम ऐक्याचे प्रतीक म्हणूनही या शिमगोत्सवाकडे पाहिले जाते. गोवळकोट येथील मशिदीला पालखी भेटीचा कार्यक्रम झाल्यानंतर या ठिकाणी चौगुले कुटुंबीयातर्फे मानाच्या पहिल्या आरतीने या शिमगोत्सवाची सुरुवात झाली. त्यानंतर गोविंदगडावरील श्री रेडजाईदेवी भेटीचा कार्यक्रम तितकाच उत्साहात झाला. गुरुवारी या शिमगोत्सवातील अतिशय जिव्हाळ्याचा शेरणे कार्यक्रमाला भाविकांची प्रचंड गर्दी होती. शुक्रवारी सकाळी ७.१५ वाजता दोन्ही पालख्यांचे पेठमापहून गोवळकोट येथे प्रयाण झाले. या ठिकाणी भद्रेचा होम लावून पालख्या येथील सहाणेवर विराजमान झाल्या. येथे दिवसभर ओटी भरण्याचा कार्यक्रम झाला. सायंकाळी ५ वाजल्यापासून पुन्हा मंदिरात मिवरणुकीने पालखी सोहळा सुरू झाला.

मंदिराभोवती पाच प्रदक्षिणा घालताना भाविकांच्या डोळ्यांचे पारणे फिटले. रात्री ८ वाजता दोन्ही पालख्यानी मंदिरात प्रवेश केल्यानंतर नृत्य व महाआरतीने सोहळ्याची सांगता केली.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:55 AM 15/Mar/2025