कुंभार्ली घाटात सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांसह पाहणी

चिपळूण : कुंभार्ली घाटात झालेल्या अपघातानंतर घाटाच्या सुरक्षिततेबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. या संदर्भात सर्वपक्षीय पदाधिकाऱ्यांनी आवाज उठवत सार्वजनिक बांधकाम विभागाने संयुक्त पाहणी करण्याची मागणी केली होती. याची दखल घेत कार्यकारी अभियंता रामसे यांनी पदाधिकाऱ्यांसमवेत कुंभार्ली घाटाची पाहणी केली.

या वेळी संपूर्ण घाटरस्त्याची पाहणी करण्यात आली. खंबाटकी घाटाप्रमाणे सुरक्षेच्या उपाययोजना कुंभार्ली घाटात राबवाव्यात, अशी मागणी काँग्रेसचे माजी तालुकाध्यक्ष भरत लब्धे यांनी केली.

कुंभार्ली घाटाच्या धोकादायक स्थितीमुळे या घाटात सतत अपघात होत असतात. दरीकडील बाजूकडे पुरेशा उंचीचे सुरक्षित कठडे नसल्याने घाट असुरक्षित झाला आहे. येथे अवजड वाहनांची नेहमी वाहतूक असते. २३ फेब्रुवारीला झालेल्या मोटार अपघातात सुरेखा खेडेकर व विश्वजित खेडेकर या माय-लेकांचा मृत्यू झाला. त्यानंतरही आठ दिवसांत तीन अपघात झाले. या पार्श्वभूमीवर घाटातील धोकादायक ठिकाणांची पाहणी केली. धोकादायक ठिकाणी रस्त्यापासून दीड ते दोन मीटर उंचीचे संरक्षण कठडे असावेत, संपूर्ण घाटात रिफ्लेक्टर बसवावेत, शक्य असल्यास महत्त्वाच्या ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसवावेत, अशीही चर्चा करण्यात आली. माजी सभापती शौकत मुकादम व जयंद्रथ खताते यांनीही अधिकाऱ्यांना काही सूचना केल्या. पाहणीदरम्यान काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष भरत लब्धे, काँगेसचे ओबीसी जिल्हाध्यक्ष महादेव चव्हाण, मनसेचे तालुकाध्यक्ष विश्वनाथ डोळस, काँग्रेसचे ओबीसी तालुकाध्यक्ष केशव लांबे, उपविभागीय अभियंता अरुण मुलाजकर, अभियंता रोहित पाटील, शाखा अभियंता वाजे, संकेत महाडिक, नितीन शिंदे हे स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक उपस्थित होते.

राष्ट्रीय महामार्ग अधिकाऱ्यांसमवेत बैठक
पिंपळी बुद्रुक ते घाटमाथा हा मार्ग आतापर्यंत सार्वजनिक बांधकाम खात्याच्या अखत्यारित होता. आता तो राष्ट्रीय महामार्ग विभागाकडे हस्तांतरित होत असल्याचे पत्र कार्यकारी अभियंता रामसे यांनी भरत लब्धे यांना दाखवले. तर या घाटाच्या उपाययोजना करण्यासाठी राष्ट्रीय महामार्ग अधिकाऱ्यांसमवेत शिमगा महोत्सवानंतर बैठक घेण्याचे ठरले.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:19 PM 15/Mar/2025