रत्नागिरी : राज्याचे उद्योगमंत्री तथा रत्नागिरीचे पालकमंत्री उदय सामंत यांच्या पाठपुराव्याने साकारत असलेल्या रतन टाटा स्किल डेव्हलपमेंट सेंटरसह रत्नागिरीतील परिपूर्ण शिवसृष्टी तसेच थ्रीडी शो चे सोमवारी लोकार्पण करण्यात येणार आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत हे कार्यक्रम होणार आहेत.
रत्नागिरी शहरानजीकच्या चंपक मैदानात रतन टाटा स्किल डेव्हलपमेंट सेंटर उभारण्यात येणार आहे. या कामाचे भूमिपूजन उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते सोमवारी सायंकाळी ४ वाजता करण्यात येणार आहे. या कार्यक्रमाला अभियांत्रिकेचे शिक्षण घेणारे जवळपास तीन हजार विद्यार्थी उपस्थित राहणार आहेत. अभियांत्रिकी शिक्षणापश्चात कोणत्या प्रकारचे कौशल्य प्राप्त करावयाचे याचे सादरीकरण यावेळी दिले जाणार आहे.
या कार्यक्रमासह भगवती किल्ल्यावर उभारण्यात आलेल्या शिवसृष्टीच्या दुसऱ्या टप्प्याचे लोकार्पण करण्यात येणार आहे. येथील टप्पा क्रमांक एक मागील वर्षी नवरात्रोत्सवादरम्यान खुला केला आहे.
तसेच उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत शहरातील थिबा पॅलेस येथे सुरू करण्यात येणाऱ्या थ्रीडी मल्टीमीडिया शो चे लोकार्पण करण्यात येणार आहे हा कार्यक्रम सोमवारी रात्री ८ वाजता होणार आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:21 17-03-2025














