थकीत वीजबिल ग्राहकांवर उद्यापासून कारवाईची मोहीम तीव्र होण्याची शक्यता

रत्नागिरी : महावितरणच्या वीज बिल थकबाकीची वसुली आणि कारवाईची मोहीम मंगळवारपासून तीव्र होण्याची शक्यता आहे. महावितरणचे सह व्यवस्थापकीय संचालक जगदाळे सोमवारी महावितरणच्या सर्व अधिकाऱ्यांची चिपळूण येथे थकबाकी आढावा बैठक घेणार आहेत. यावेळी थकीत वीज बिल वसुलीसाठी स्थानिक अधिकाऱ्यांवर १०० टक्के दबाव निर्माण होण्याची शक्यता आहे. परिणामी, मंगळवारपासून वसुलीची मोहीम आणि कारवाई वेगाने सुरू होण्याची शक्यता आहे.

सहव्यवस्थापकीय संचालकांच्या चिपळुणातील आढावा बैठकीला जिल्ह्यातील शाखा अभियंता वगळता इतर सर्व अभियंत्यांना आढावा बैठकीसाठी बोलावण्यात आले आहे. मार्चअखेर असल्याने जिल्ह्यातील बीज बिल थकबाकी १०० टक्के वसुली व्हावी, यासाठी अधिकाऱ्यांना सक्त सूचना होण्याची शक्यता आहे. थकीत बिल वसुलीच्या संदर्भातील बैठकीसाठी प्रथमच सहव्यवस्थापकीय संचालकांचा दौरा होत असल्याने महावितरणच्या अधिकाऱ्यांकडून वीज बिल भरण्याचे आवाहन ध्वनिक्षेपकावरून सुरूही झाले आहे.

महावितरणच्या थकीत वीज बिल वसुलीसाठी दर महिन्याला स्थानिक वरिष्ठ अधिकारी शाखा अभियंत्यांची बैठक घेऊन सक्त सूचना करत असतात. आता वरिष्ठ अधिकाऱ्यांचीच थकीत वीज बिल वसुलीबाबत कानउघाडणी होणार, असल्याने मंगळवारपासून थकीत वीज बिल धारकांवर कारवाईचा बडगा उचलला जाणार आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:23 AM 17/Mar/2025