चिपळुणात मटण ८०० रुपये किलो

चिपळूण : धुळवडीदिवशी तिखट जेवणावेळीचा बेत आखलेल्या अनेक मांसाहारींना मटण खरेदीसाठी प्रतिकिलो ८०० रुपये मोजावे लागले. बर्डफ्लूच्या साथीमुळे चिकनऐवजी मटणाच्या खरेदीसाठी दुकानाबाहेर नागरिकांनी रांगा लावल्या होत्या.

शेळीपालनाऐवजी फळ आणि पालेभाज्यांची पिके घेण्याकडे वाढलेला कल, शेळीपालनात झालेली घट, प्रजनन कालावधीपूर्वीच बोकड आणि मेंढ्यांची होणारी विक्री, मागणीच्या तुलनेत कमी झालेला पुरवठा तसेच काही भागात पसरलेली बर्ड फ्लूची साथ अशा विविध कारणांमुळे मटणाचे दर वाढत आहेत.

कोकणात अनेक भागात होळीनिमित्त पुरणपोळीचे जेवण केले जाते. दुसऱ्यादिवशी धुळवडीला तिखटाच्या जेवणाला प्राधान्य दिले जाते. त्यामुळे दरवर्षी धुळवडीला मटणाच्या खरेदीसाठी ग्राहकांची झुंबड उडते.

दरवर्षीप्रमाणे यंदाही धुळवडीनिमित्त सकाळपासून ग्राहकांनी मटणाच्या दुकानांबाहेर रांगा लावल्या होत्या. चिपळूणमध्ये बोकडाच्या मटणाचे दर प्रतिकिलो ७०० ते ७५० रुपये असतात; मात्र, यंदा धुळवडीनिमित्त प्रतिकिलो ८०० ते ८५० रुपये दराने मटणाची विक्री होत होती. शुक्रवारी सकाळपासूनच मटण खरेदी करण्यासाठी खवय्यांनी खाटकांच्या दुकानांबाहेर गर्दी केली होती. लांबच लांब रांगा लागलेल्या असतानाही अनेकांनी बोकडाचे मटण खरेदी केले. अनेक दुकानांबाहेर शुक्रवारी रात्रीही मटण खरेदीसाठी गर्दी झाल्याचे दिसून आले.

बर्ड फ्लूच्या सावटामुळे अनेकांनी कोंबडीकडे पाठ फिरवली आहे. परिणामी, मटणाच्या मागणीत वाढ झाली आहे. मासे खरेदीलाही काहीजण प्राधान्य देतात; मात्र होळीनिमित्त बोकडाच्या मटणाची मोठ्या प्रमाणात विक्री होते. त्यातच गावरान मटणाला अधिक मागणी असते. मटण घेताना लोक चरबी घेत नाहीत. ज्यांना चरबी नको अशा ग्राहकांना आम्ही वेगळे दर ठेवले आहेत. लोक स्वखुशीने घेतात- बिलाल पालकर, मटणविक्रेते, चिपळूण

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
03:18 PM 17/Mar/2025