चिपळूण : डेरवणच्या वालावलकर महाविद्यालयाची ‘रिसर्च फॉर रूरल हेल्थक्लब’ साठी निवड

चिपळूण : आई.सी.एम. आर. संलग्नित दिल्ली येथील सेंटर फॉर क्रोनिक डीसीझेस भारतातील सहा वैद्यकीय महाविद्यालयात रिसर्च फॉर रुरल हेल्थकेअरची स्थापना करणार असून या यादीत डेरवणच्या वालावलकर वैद्यकीय महाविद्यालयाचा समावेश असल्याची माहिती डिपार्टमेंट ऑफ कॉम्युनिटी मेडिसिनचे मुख्य अध्यापक डॉ. गजाजन वेल्हाळ यांनी दिली.

डेरवण येथील भ. क. ल. वालावलकर वैद्यकीय महाविद्यालयात ज्येष्ठ अणुशास्त्रज्ञ, पद्मविभूषण अनिल काकोडकर यांच्या अध्यक्षतेखाली १८वी शास्त्रीय सल्लागार समितीची बैठक पार पडली.

या बैठकीला समितीचे इतर सदस्य टाटा मेमोरियलचे अकॅडेमिक डायरेक्टर डॉ. श्रीपाद बाणावली, डॉ. रिटा मुल्हेरकर, माजी सचिव डॉ. जयंत बांठिया, टाटा इन्स्टिट्यूट ऑफ फंडामेंटल रिसर्च, हैद्राबाद येथील शाखेतील प्रोफेसर डॉ. महेंद्र सोनावणे, टालवीन कौर, डॉ. अरविंद नातू यांनी ऑनलाइन उपस्थिती दर्शवली.

टाटा इन्स्टिट्यूट ऑफ फंडामेंटल रिसर्च आणि वालावलकर महाविद्यालयाच्या सहकार्याने होणाऱ्या सर्व संशोधन उपक्रमाची माहिती या बैठकीत सादर करण्यात आली. डॉ. सुवर्णा पाटील यांनी उपक्रमांचा आढावा सादर केला. डॉ. वेल्हाळ यांनी माहिती देताना सांगितले की, आई.सी.एम. आर संलग्न दिल्ली येथील सेंटर फॉर क्रोनिक डीसीझेस हे भारतातील सहा वैद्यकीय महाविद्यालयात रिसर्च फॉर रूरल हेल्थकेअरची स्थापना करणार आहेत आणि त्या यादीत वालावलकर महाविद्यालयाचे नाव समाविष्ट केले गेले आहे. ही एक अभिमानाची बाब असून त्याद्वारे ग्रामीण भारतातील विषमता दूर करण्यासाठी आणि दर्जेदार प्राथमिक सेवेत सुधारणा करणे असा महत्त्वाकांक्षी उपक्रम राबवण्यात येणार असल्याची माहिती त्यांनी दिली.

कोकण विभागातील मुलांमध्ये मधुमेह पूर्व लक्षणे, रक्तातील कॉपर, झिंक आणि जीवनसत्वे, कोकणातील मधुमेही रुग्णांमध्ये इन्सुलिन, युरिक एसिड, होमोसिस्टीनची पातळी अशा अनेक गंभीर विषयांवर डॉ. वैभव राऊत, डॉ. आशिष गायकवाड, डॉ. अनिकेत खलाडकर, डॉ. अजय पाटील, डॉ. लोचन माळंदकर, डॉ. प्रवीण बागड, डॉ. वैभव मेथी, डॉ. अक्षय बोंदारे यांनी आपले सादरीकरण केले.

स्टेम सेल या विषयावरील संशोधनावरही डॉ. रिटा मुल्हेरकर, डॉ. सुनील नाडकर्णी, अंकिता बेंद्रे, शर्वाणी डोळे यांनी प्रकल्प सादरीकरण केले. कोकणात मुबलक उपलब्ध असलेल्या फणसाचे फायदे, मधमाशीतून मिळणारे प्रोपोलिस आणि त्याची उपचारात्मक क्षमता यावर डॉ. गौरी पुरोहित आणि डॉ. रोहित मट यांनी, तर ग्रामीण सक्षमीकरण आणि सामुदायिक आरोग्यावरील अपडेट्स डॉ. ज्योती अय्यर यांनी सादर केले.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
02:05 PM 05/Oct/2024