रत्नागिरी : शासनाने परमिट रूम बारमधील मद्य विक्रीवर १०% व्हॅट करवाढ आणि २०२५-२६ साठी परवाना नूतनीकरण फीमध्ये १५% वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. या दोन्ही निर्णयांना अन्यायकारक ठरवत रत्नागिरी जिल्हा हॉटेल असोसिएशनने तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. या जाचक निर्णयांमुळे बार व्यवसायिकांचे मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान होणार असल्याचे असोसिएशनने म्हटले आहे. या निर्णयाचा जाहीर निषेध करण्यासाठी आज, २० मार्च २०२५ रोजी सकाळी ११ ते सायंकाळी ५ या वेळेत रत्नागिरी जिल्ह्यातील सर्व परमिट रूम बार व्यवसाय बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
महाराष्ट्र राज्य हॉटेल असोसिएशन (आहार) आणि राज्यातील अनेक जिल्हा असोसिएशन यांनीही या निषेधाला पाठिंबा दर्शवला असून, उद्या त्यांचे व्यवसाय बंद ठेवून शासनाच्या निर्णयाविरोधात आवाज उठवणार आहेत. रत्नागिरी जिल्हा हॉटेल असोसिएशननेही या सर्व असोसिएशनांना पाठिंबा देण्याचे जाहीर केले आहे. त्यानुसार, आज सकाळी ११ ते सायंकाळी ५ या वेळेत जिल्ह्यातील सर्व परमिट रूम बार बंद राहतील आणि निषेधात सहभागी होतील.
असोसिएशनचे निवेदनरत्नागिरी जिल्हा हॉटेल असोसिएशनचे अध्यक्ष श्री रमेश कीर, उपाध्यक्ष श्री उदय लोध आणि सचिव सुनील देसाई यांनी संयुक्त निवेदनात म्हटले आहे की, “शासनाचे हे निर्णय बार व्यवसायिकांसाठी अत्यंत जाचक आहेत. यामुळे आमच्या व्यवसायावर मोठा आर्थिक भार पडणार आहे. या निर्णयाचा निषेध म्हणून आम्ही गुरुवारी व्यवसाय बंद ठेवून शासनाला आमचा विरोध दर्शवणार आहोत. सर्व व्यवसायिकांनी या बंदमध्ये सहभागी होऊन सहकार्य करावे, अशी विनंती आहे. ”व्यवसायिकांचा सहभाग अपेक्षितरत्नागिरी जिल्ह्यातील परमिट रूम बार व्यवसायिकांनी या बंदमध्ये मोठ्या प्रमाणात सहभागी होऊन एकजुटीने शासनाच्या निर्णयाविरोधात आवाज उठवावा, असे आवाहन असोसिएशनने केले आहे.
हा निषेध शांततापूर्ण मार्गाने व्यक्त केला जाणार असून, शासनाने या निर्णयांचा फेरविचार करावा, अशी मागणीही व्यवसायिकांकडून करण्यात येत आहे. या बंदमुळे आज रत्नागिरी जिल्ह्यातील परमिट रूम बार व्यवसाय पूर्णपणे ठप्प राहणार असून, शासनाच्या धोरणांवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:21 20-03-2025














