गुहागर : तवसाळ गाव पंचक्रोशीत नेत्रदीपक शिमगोत्सवाचा जल्लोषात समारोप

गुहागर : तवसाळ गाव पंचक्रोशीतील तांबडवाडी-बाबरवाडी, तवसाळ खुर्द, तवसाळ पडवे, तवसाळ मोहीतेवाडी, तवसाळ आगर (रोहीले), तांबडवाडी बौद्धवाडी, तवसाळ बौद्धवाडी आदी संपूर्ण भागात पारंपरिक उत्साहात शिमगोत्सव सोहळा साजरा झाला. गावच्या परंपरेनुसार १२ शिमगेचे होम करण्यात आले. यापैकी ९ होम विविध ठिकाणी पार पडले, तर ३ होम आई श्री महामाई सोनसाखळी देवीच्या चरणस्पर्शाने साजरे झाले.शिमगोत्सवाची भव्य सुरुवात दि. १३ मार्च २०२५ रोजी रात्री उशिरा गावातील देवतांना रूपे लावून पालखीत विराजमान करण्यात आले. आई श्री महामाई सोनसाखळी मंदिर परिसरात मध्यरात्री १२ वाजता होमाला आग लावण्यात आली आणि दहावा होम प्रारंभ झाला.

या वेळी श्री राजेश रमेश गडदे (महामाई सोनसाखळी देवीचे मानकरी), तवसाळ गावचे खोत, गावकरी, पंचक्रोशीतील ग्रामस्थ आणि मानकरी उपस्थित होते. कर्दै गावच्या गुरव कुटुंबाने वडिलोपार्जित सेवेतून पूजाअर्चा केली.१४ मार्चच्या सकाळी ९ वाजता भाविकांनी मंदिर परिसरात दर्शनासाठी गर्दी केली. पालखी सहानेवर विराजमान होती आणि परिसर जत्रेच्या थाटात नटला होता. तवसाळ खुर्द येथे देवीच्या पालखीचा हळदी-कुंकू कार्यक्रम पार पडला. त्यानंतर गावात घरोघरी देवीच्या दर्शनासाठी पालखीची फेरी निघाली.समुद्रपूजन आणि परंपरेचा जागरतवसाळ खुर्द पंचक्रोशीत मोठी जत्रा भरली. यानंतर देवीला जयगड खाडी येथे फेरी बोटीने नेऊन नारळ अर्पण करण्यात आला. लोकश्रुतीनुसार, देवी आपल्या बहिणीला भेटण्यासाठी समुद्रमार्गे जाते, ही परंपरा आजही जिवंत ठेवली जाते. परत आल्यावर अकराव्या होमाची सांगता झाली.शिमगोत्सवाचा पारंपरिक जल्लोषमहामाई सोनसाखळी साऊंड सर्विस आणि गणेश सागवेकर यांनी भव्य मंडप उभारला.

यावेळी तमाशा नृत्य हा कार्यक्रमाचा मुख्य आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरला. भंडारी साज, पेहराव, मृदंगाचा ताल आणि घुंगरांच्या नादात रंगलेल्या या नृत्याने उपस्थितांची मने जिंकली. त्यानंतर रोहीले बीच (तवसाळ आगर) येथे पालखी नाचविण्याचा विधी पार पडला. अनेकांनी होमात नारळ अर्पण केले आणि बाराव्या होमाने शिमगोत्सवाची सांगता झाली.अक्षय तृतीयेपर्यंत पालखी दर्शनशिमगोत्सवानंतर पालखी तवसाळ खुर्द सहानेवर ठेवण्यात आली असून, ती ३० एप्रिल २०२५ (अक्षय तृतीया) पर्यंत दर्शनासाठी उपलब्ध राहील. त्यानंतर गावातील प्रत्येक घरात दर्शन यात्रेला प्रारंभ होईल.सोहळ्याचे यशस्वी आयोजनया नेत्रदीपक सोहळ्याचे फोटोग्राफी प्रणय सुर्वे, हर्षद सुर्वे, दिपक जोशी, प्रितम सुर्वे यांनी केली, तर DJ सचिन कुळये यांनी सोशल मीडियाद्वारे प्रसार करून हा उत्सव राज्यभर पोहोचवला.

या सर्वांच्या योगदानामुळे शिमगोत्सवाला विशेष महत्त्व प्राप्त झाले.संस्कृती आणि एकजुटीचे दर्शनहा शिमगोत्सव जातिभेदाच्या पलीकडे जाऊन सर्व समाजाला एकत्र आणणारा ठरला. तवसाळ पंचक्रोशीत संस्कृतीचे जतन, परंपरांचा सन्मान आणि समाजाची एकजूट यांचा सुंदर संगम या उत्सवातून दिसून आला. हा सोहळा भाविकांसाठी अविस्मरणीय ठरला.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:22 AM 20/Mar/2025