म्हसळा : म्हाप्रळ (जि. रत्नागिरी) येथे होळीच्या वादातून सहकाऱ्याचा रॉडने मारहाण केले. त्याचा खून करून मृतदेह म्हसळा तालुक्यात आणून टाकणाऱ्या तीन आरोपींना म्हसळा पोलिसांनी अटक केली आहे. अवघ्या १२ तासांत शीघ्रगतीने पोलिसांनी हा तपास पूर्ण करत आरोपींच्या हातात बेड्या ठोकल्या.
याबाबतचे वृत्त असे, म्हाप्रळ येथील एका बांधकामाच्या साईटवर काम करणाऱ्या विशाल देवरुखकर (रा. गुहागर), श्यामलाल मोर्य (रा. उत्तरप्रदेश) यांनी आपल्याच सोबत काम करणाऱ्या बादशहा नामक मित्राला होळीच्या सणात झालेल्या भांडणाचा काटा काढण्यासाठी रॉडने अमानुष मारहाण करत ठार मारले आणि मृतदेह गोणीत भरून म्हसळा तालुक्यातील पांगळोली बंडवाडी येथील हुंबरवण्याचे नाल्या जवळच्या झुडुपात टाकला. सोमवारी सायंकाळी म्हसळा पोलिसांना एक मृतदेह पोत्यात भरून टाकल्याचा संशय असल्याची खबर आली होती. पोलीस सपोनि संदिप कहाळे यांनी तत्परता दाखवत घटनास्थळी धाव घेत पाहणी केली असता घटनास्थळी ४० ते ४५ वर्षाच्या अनोळखी इसमाचा कुजलेल्या अवस्थेत खून करून मृतदेह पोत्यात भरून फेकुन दिलेल्या अवस्थेत आढळून आला. स्थानिकांना देखील शवाची ओळख पटत नव्हती.
शवाची तपासणी केली असता त्याच्या खिशात असलेली डायरी म्हसळा पोलिसांना मिळाली. डायरीत एकच मोबाईल नंबर रेखाटलेला होता. सदरचा नंबर श्रीवर्धन तालुक्यातील कोंडे पंचतन येथे राहणाऱ्या संतोष साबळे याचा असल्याची खात्री झाली. साबळे छोटे मोठे कामाचे कंत्राट घेत असून लेबर पुरवण्याचे काम करतो. पोलिसांनी तात्काळ साबळेला घटनेची माहिती देत पोलीस ठाण्यात बोलावले असता, त्याने पोलिसांना उडवाउडवीची उत्तरे देण्यास सुरुवात केली. म्हसळा पोलिसांनी तात्काळ आपली सूत्र हलवत रत्नागिरी जिल्ह्यातील म्हाप्रळ येथील साबळेच्या साईटवरून दोन कामगारांना अटक केली.
आरोपींची कसून चौकशी केली असता, त्यांनी गुन्ह्याची कबुली देत होळीच्या वादातून हा खून केल्याचे सांगितले आहे. खून केल्याची माहिती आरोपींनी मालक साबळे याला दिल्यानंतर साबळे यांनी मृतदेह पोत्यात भरून रायगड जिल्ह्याच्या हद्दीत टाकले. या घटनेची म्हसळा पोलिस ठाण्यात माजी पोलीस पाटील रमेश मोहन दुर्गवले यांनी फिर्याद दिली असता, म्हसळा पोलीसांनी आरोपींवर गुन्हा दाखल केला आहे. गुन्ह्याचा लागलीच छडा लावण्यासाठी पोलिस विभागीय अधिकारी सविता गर्जे, सहाय्यक पोलिस निरीक्षक संदीप काहाळे, उप पोलिस निरीक्षक ज्ञानेश्वर एडवले, संतोष चव्हाण, सागर चितारे, विघ्ने, स्वप्नील निळेकर यांच्या पथकाने आरोपी संतोष साबळे (रा. कोंडे पंचतन), विशाल देवरुखकर (रा. गुहागर), श्यामलाल मौर्य (रा. उत्तर प्रदेश) यांना ताब्यात घेऊन अवघ्या १२ तासातच बेड्या ठोकल्या आहेत. अधिक तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक संदीप कहाळे हे करीत आहेत.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:27 AM 20/Mar/2025













