रत्नागिरी : दारूच्या नशेत रिक्षाचालकाचा धिंगाणा; वृद्धाला धमकी, तरुणीला मारहाण

रत्नागिरी : रत्नागिरी तालुक्यातील भाट्ये गावाकडे जाणाऱ्या रस्त्यावर , दि. २० मार्च २०२५ रोजी सायंकाळी ६ वाजेच्या सुमारास दारूच्या नशेत धुंद झालेल्या रिक्षाचालकाने एका ७२ वर्षीय वृद्धाच्या गाडीला धडक देऊन त्यांच्यावर हल्ला केल्याची धक्कादायक घटना घडली. या प्रकरणी रत्नागिरी पोलिसांनी दि. २१ मार्च २०२५ रोजी पहाटे १:२१ वाजता गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.

फिर्यादी मुक्तार अब्दुलसत्तार मुजावर (वय ७२) हे रत्नागिरी येथून इफ्तारीचे सामान घेऊन आपल्या मारुती सेलेरियो गाडीने (क्रमांक MH 08 AX 7542) पावस रोडमार्गे घरी निघाले होते. झरी विनायक मंदिरापासून सुमारे २०० मीटर पुढे गेल्यावर भाट्ये गावाकडे जाणाऱ्या रस्त्यावर आरोपी रफीक मुअज्जम मुजावर (रा. भाट्ये) याने दारूच्या नशेत आपली रिक्षा (क्रमांक MH 08 AQ 3764) भरधाव वेगाने चालवत फिर्यादी यांच्या गाडीला जोरदार धडक दिली. या धडकेमुळे गाडीचे नुकसान झाले. यापुरते न थांबता आरोपीने फिर्यादींना शिवीगाळ करत जीवे मारण्याची धमकी दिली आणि त्यांना गाडीतून खाली उतरवण्याचा प्रयत्न केला.

फिर्यादी हे घडलेल्या प्रकाराची तक्रार देण्यासाठी पोलीस ठाण्याकडे निघाले असता, आरोपीने पुन्हा त्यांची गाडी अडवून शिवीगाळ सुरू केली. यावेळी फिर्यादी यांची मुलगी आणि तिची मैत्रीण भांडण सोडवण्यासाठी पुढे आल्या. मात्र, आरोपीने त्यांच्यावरही हल्ला चढवला. फिर्यादी यांच्या मुलीच्या मैत्रिणीच्या डोळ्याजवळ चापट मारल्याने तिला किरकोळ दुखापत झाली आहे.

या घटनेनंतर फिर्यादी यांनी रत्नागिरी पोलीस ठाण्यात धाव घेतली. पोलिसांनी आरोपी रफीक मुअज्जम मुजावर याच्याविरुद्ध भारतीय न्यायसंहिता अधिनियम २०२३ अंतर्गत कलम १२६(२) (रस्ता अडवणे), ११५(२) (स्वेच्छेने दुखापत करणे), ३५१(२) (धमकी देणे), ३२४(२) (हल्ला) तसेच मोटार वाहन कायद्याच्या कलम १८४ (धोकादायक वाहन चालवणे) आणि १८५ (दारू पिऊन वाहन चालवणे) याप्रमाणे गुन्हा नोंदवला. गुन्हा क्रमांक ११२/२०२५ असा दाखल झाला असून, पोलिसांनी तपासाला सुरुवात केली आहे.
या घटनेमुळे भाट्ये परिसरात दारू पिऊन वाहन चालवणाऱ्यांविरुद्ध संताप व्यक्त होत आहे. स्थानिकांनी पोलिसांनी कठोर कारवाई करून अशा घटनांना आळा घालावा, अशी मागणी केली आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:13 22-03-2025