चिपळूण : सांस्कृतिक कार्य विभाग, सांस्कृतिक कार्य संचालनालय महाराष्ट्र शासन यांच्या वतीने राज्यातील लोककला, लोकपरंपरा व लोकसंस्कृतीचे जतन व संवर्धन व्हावे तसेच नवीन पिढीला आपल्या उच्च संस्कृतीची व परंपरेची ओळख व्हावी या उद्देशाने चिपळूण येथे २५ ते २७ मार्च या कालावधीत नमन महोत्सव आयोजन करण्यात आले आहे.
सांस्कृतिक कार्य मंत्री अॅड. आशिष शेलार यांच्या अभिनव संतकल्पनेतून व मुख्यमंत्री यांचे अपर मुख्य सचिव तथा अप्पर मुख्य सचिव विकास खारगे (सांस्कृतिक कार्य विभाग) यांच्या मार्गदर्शनाखाली कोकणातील पारंपरिक लोककलेचा नमन महोत्सव होत आहे. या महोत्सवाचे उद्घाटन २५ रोजी सायंकाळी ६ वाजता शहरातील इंदिरा गांधी सांस्कृतिक केंद्र येथे मान्यवरांच्या उपस्थित होणार आहे. यावेळी पालकमंत्री डॉ. उदय सामंत, सांस्कृतिक कार्यमंत्री अॅड. आशिष शेलार, गृहराज्यमंत्री योगेश कदम, खासदार सुनील तटकरे, खा. नारायण राणे, आमदार डॉ. निरंजन डावखरे, आ. प्रसाद लाड, आ. किरण सामंत, ज्ञानेश्वर म्हात्रे, आ. भास्कर जाधव व आ. शेखर निकम उपस्थित राहणार आहेत.
सलग तीन दिवस हा महोत्सव रंगणार आहे या महोत्सवात दिनांक २५ मार्च रोजी बालमित्र नमन मंडळ, कोंड्ये देवळाचीवाडी संगमेश्वर व श्री काळभैरव नमन नाट्य मंडळ वाडदई (वरची वाडी, ता. गुहागर) यांचे नमन होईल. दिनांक २६ मार्च रोजी श्री मठ बाबा नमन मंडळ, रूण (ता. लांजा), हौशी कलावंत नाट्य नमन, भू पंचक्रोशी (ता. राजापूर), श्री सह्याद्री मार्लेश्वर कला मंच, देवरूख
संगमेश्वर व श्री हनुमान भक्त सेवा मंडळ, फणसवळे (ता. रत्नागिरी) यांचे नमन सादर होईल.
दिनांक २७मार्च रोजी श्रीराम नाट्य नमन मंडळ कामथे हुमणेवाडी (चिपळूण), नवयुग सेवा नमन मंडळ, आसगे मांडवकरवाडी (लांजा), श्री रासाई उत्कर्ष नमन मंडळ कुवे (लांजा), शिवभक्त कोकण लोकनाट्य नमन मंडळ, संगमेश्वर या कलापथकांचे सादरीकरण होईल. नमन महोत्सव रसिक प्रेक्षकासाठी विनामूल्य आहे. या महोत्सवात सहभागी कलाकाराचा किंबहुना या कलापथकाचा, संगीत नृत्याचा मिलाफ असणाऱ्या कार्यक्रमाचा कला रसिक प्रेक्षकांनी आस्वाद घ्यावा, असे आवाहन विभीषण चवरे, संचालक सांस्कृतिक कार्य यांनी केले आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:25 AM 25/Mar/2025














